लोकमत न्यूज नेटवर्कचिंचवड : पाणी बचतीसाठी शहरात नागरिकांना उपदेश देणारे पालिका प्रशासनच पाणीगळतीबाबत कुचकामी ठरत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ ने १७ मे रोजी पाणी बचतीवर प्रशासनच फिरवतेय पाणी या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते त्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. चिंचवडमध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी होऊनही पाणीगळती रोखली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने हा विषय चर्चेत होता. येथील पाणीगळती रोखण्याचे काम गुरुवारी युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले.चिंचवडगावाकडून थेरगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा भागात रस्त्याचे काम सुरू आहे. या साठी रस्ते खोदले आहेत. गोखले वृंदावन सोसायटी समोर उड्डाणपुलाखाली पाण्याच्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाण्याची नासाडी रोखण्यासाठी पाठपुरावा केला. लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्यानंतर प्रशासनाने हे काम सुरू केल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.चिंचवडगावातील पाणीगळती रोखण्यासाठी या भागातील पाणीपुरवठा बंद करून काम करावे लागणार असल्याचे सांगण्यात येत होते. शहरातील पाणीपुरवठा बंद असल्याने हे काम हाती घेतल्याचे उप अभियंता आहेरे यांनी सांगितले. शहरातील अनेक भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. हे प्रकार प्रशासनाने थांबविल्यास पाण्याची बचत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चिंचवडमधील थांबली पाणीगळती
By admin | Published: May 26, 2017 6:10 AM