आम्ही जातो आमच्या गावा...तुमचा प्रवास सुखाचा व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:08 PM2020-05-14T17:08:37+5:302020-05-14T17:10:02+5:30
घराचे वेध लागलेल्या मध्यप्रदेशातील ७६ जणांना आज निरोप
पिंपरी - चिंचवड :- वेळ दुपारी तीन वाजताची चिंचवड गावातील क्रांतिवीर चापेकर चौकात महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद चा नारा सुरू झाला.निवारा केंद्रातून परतीच्या प्रवासासाठी गावाकडे जाण्याचा मार्ग खुला होताच मागील चाळीस दिवसांपासून घराचे वेध लागलेल्या मध्यप्रदेशातील ७६ जणांना आज सुखरूप निरोप देण्यात आला.पालिका प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस प्रशासनाने केलेल्या मदतीची परतफेड शब्दांतून व्यक्त करत निवारा केंद्रातील नागरिकांनी आम्ही जातो आमच्या गावा म्हणताच आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणत या सर्वांना निरोप देण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आला.अचानक ओढवलेल्या या संकटात अडकलेल्या अनेक मजूर व त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले.राहण्यासाठी घर नसल्याने वणवण भटकणाऱ्या नागरिकांना महापालिका प्रशानाने निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था केली.लॉक डाऊन वाढत चालल्याने अनेक परराज्यातील नागरिकांना घरचे वेध लागले होते.केशवनगर मधील महापालिकेच्या शाळेत वास्तव्यास असणाऱ्या २६ व चिंचवड परिसरातील ५० नागरिकांना आज त्यांच्या मूळगावी जाण्याचा रस्ता मोकळा करण्यात आला.
हे सर्वजण आज दुपारी चिंचवड मधून पुण्याकडे बसद्वारे रवाना झाले.लॉकडाऊन काळात येथील नागरिकांना अग्रेसर भवन मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भोजन व्यवस्था उपलब्ध केली होती.महापालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी,ब प्रभागाच्या क्षेत्रीय अधिकारी प्रभावती गाडेकर कर्मचारी रसूल शेख,अजय गायकवाड,वाहन चालक हनुमंत शिंदे,विद्या कावडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव,पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या सह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.चिंचवड पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष योगदान दिले.
या नगरिकांना परतीच्या प्रवासासाठी सुरक्षिततेची साधने,फूड पॅकेट देण्यात आले.गावाकडे जाण्याचा मार्ग सुखकर झाल्याने सर्वांचे चेहरे हस्याने फुलले होते.प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्व यंत्रणेचे आभार मानले.आज रात्री आठ वाजता पुणे स्टेशवरून रेल्वेने हे मध्यप्रदेश कडे रवाना होणार आहेत.