आम्ही कोणाच्याही आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देणार नाही- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 02:05 PM2023-08-25T14:05:51+5:302023-08-25T14:06:42+5:30
आज पिंपरी चिंचवड अजित पवार दौऱ्यावर आहेत...
पुणे/पिंपरी :जगातील अर्थव्यवस्थांचा विचार केला तर सध्या आपण टॉप पाचमध्ये आहोत. पुढे आपल्याला टॉप तीनमध्ये स्थान मिळवायचे आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. देशाची अर्थव्यवस्था लवकरच ५ ट्रिलीयन डॉलरवर आपल्याला न्यायची आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महाराष्ट्र भविष्यात मोठे काम करणार आहे. यासाठी आम्ही काम सुरू केले आहे. भविष्यातील भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा १ ट्रिलीयन डॉलर असेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ते आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत.
पुढे बोलताना पवार म्हणाले, कोणत्याही आरोप-प्रत्यारोपाला आम्ही महत्त्व देणार नाही. आम्ही आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची चर्चा सुरू आहे. राज्यातील उद्योगधंदे कसे वाढतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विकासाची कामे करत असताना इतरांनी कोणत्याही बातम्या पसरवणे बंद केले पाहिजे. अर्थव्यवस्था सुधारली तर बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. कृषी, शेती, आयटी आणि इतर क्षेत्रातील वाढीसाठी प्रयत्न असेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी आढावा घेतला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मार्ग काढला जाणार आहे. स्मार्ट सिटी अभियानावरही चर्चा केली जाणार आहे. शहराचे वाढते विस्तारीकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी बोलणार आहे. त्या नवीन भागाला सर्व पायाभूत सुविधा आणि पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असंही अजित पवार म्हणाले.
पवार म्हणाले, केंद्राचा निधी राज्याला जास्तीत जास्त मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील स्वागताने मी भारावलो आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यावर विचारले असता अजित पवारांनी 'नो कमेंट्स' असं उत्तर दिले. मी फक्त आता फक्त विकासावर बोलणार आहे, त्यावर मला प्रश्न विचारा असं पवार म्हणाले.