चांदखेड : निर्व्यसनी तरुण हीच देशाची संपत्ती आहे. तरुणांनी व्यसन न करता आपले जीवन व्यतीत केले, तरच भारतीय संस्कृती टिकणार आहे, असे प्रतिपादन बालकीर्तनकार हभप ज्ञानेश्वरमहाराज पठाडे यांनी डोणे खिंड येथील कीर्तनात केले. आढले बुद्रुक, डोणे, दिवड परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित कीर्तनात हभप पठाडे बोलत होते. या वेळी पंचायत समिती सदस्य सचिन घोटकुले, पाचाणेगावचे माजी सरपंच छबनमहाराज कडू, सरपंच मनोज येवले, माजी सरपंच बाळासाहेब केदारी, लहू सावळे, भाऊसाहेब भोईर, युवराज केदारी, शांताराम वाजे, अनिल वाजे आदीसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनाला मृदंगावर साथ हभप धनाजी वाजे, प्रसाद घारे यांनी, तर हार्मोनियमवर हभप दत्तोबा सावळे यांनी साथ केली. हभप अरुणमहाराज येवले, अशोक कारके, अनिल घारे, अर्जुन अमराळे, विष्णू वाजे, बबन कडू यांनी गायनसाथ दिली. स्त्रीभ्रूणहत्या करू नये. मुलाप्रमाणे मुलींनाही शिक्षण दिले, तर ती खरी संस्कृतीची शान ठरेल. कारण आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण मुलापेक्षा मुलींना जास्त असते, असे हभप पठाडे यांनी सांगितले. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानाचे अध्यक्ष अशोक साठे , राजू साठे व राजमाता जिजाऊ महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा रुपाली संजय शेडगे यांनी संयोजन केले. (वार्ताहर)
निर्व्यसनी तरुण देशाची संपत्ती
By admin | Published: December 22, 2016 2:04 AM