- प्रकाश गायकर
पिंपरी : हौसेला मोल नाही, असे म्हणतात. त्यासाठीच लग्न समारंभामध्ये वधू-वर पित्यांकडून लाडक्या लेकरांची हौस पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. लग्न समारंभ तसेच खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंवर जीएसटी आकारला जात असल्याने समारंभाच्या खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वधू-वर पिता जीएसटीच्या फेऱ्यात अडकले असून, लग्नाचा आहेर चक्क शासनाच्या तिजोरीत जात आहे.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी अनेक पित्यांकडून आयुष्यभर तजवीज केली जाते. आपल्या मुलीच्या लग्नामध्ये कोणत्या गोष्टींची कमी पडू नये, यासाठी मुलीचे वडील कष्ट घेत असतात. थाटा-माटात लग्न करण्यासाठी प्रसंगी वधू-वर पित्यांकडून कर्ज काढले जाते. मध्यमवर्गीय कुटुंबातील लग्न सोहळा करण्यासाठी पाच ते आठ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो. तर उच्चभ्रू कुटुंबातील लग्नांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. लग्न म्हटले की कपडे, दागिने, हॉल, जेवण, फोटो यासाठी मोठा खर्च येतो. सुरुवातीला लग्नाचा बस्ता महत्त्वाचा असतो. त्यामध्ये खरेदी करणाऱ्या कपड्यांवर देखील कर आकारला जातो. त्यामुळे कपड्यांच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. कपडे खरेदी करताना त्यावर १२ टक्के जीएसटी भरल्यानंतर त्याच्या शिलाईसाठी देखील कर भरावा लागतो.
त्यानंतर, प्री-वेडिंग शूटचा ट्रेंड समाजामध्ये रुजत आहे. फोटोग्राफीसाठी ५ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावला जात आहे. त्यामुळे तो खर्च देखील वाढत आहे. त्याचप्रमाणे, केटरर्स, गॅस, हॉल यांच्या बिलावर देखील जीएसटी लावला जातो. अनेक सजग नागरिक लग्नाचा मोठा खर्च टाळून रजिस्टर पद्धतीने लग्न करतात. त्यानंतर रिसेप्शन ठेवले जाते. रिसेप्शनसाठी कमीत-कमी दोन लाखांपासून पुढे खर्च केला जातो. त्यासाठी देखील सर्व सेवांवर कर भरावा लागत असल्याने रिसेप्शनवरही कराचा भार पडत आहे. त्यामुळे लग्नसमारंभाच्या खर्चामध्ये वाढ होत आहे.
सजावटीसाठी मोजावे लागताहेत १८ टक्के जादालग्नामध्ये स्टेज सजवण्यासाठी विविध थीमचा वापर केला जातो. अनेकवेळा फोटोग्राफीसाठी देखील स्टेज चांगले सजवण्याची मागणी फोटोग्राफरकडून केली जाते. त्यामुळे मंगल कार्यालयातील स्टेज, प्रवेशद्वार तसेच बैठक व्यवस्था याठिकाणी विविध प्रकारे सजावट केली जाते. या सजावटीवर तब्बल १८ टक्के जीएसटी लावला जातो. म्हणजेच एक लाख रुपये बिल झाले तर १८ हजार रुपये जास्त मोजावे लागतात.
आपली उपस्थिती हाच आहेर....लग्नामध्ये अनेक कुटुंबांकडून लग्नाला आहेर आणू नये..., आपली उपस्थिती हाच आहेर... अशा टीप दिल्या जातात. मात्र, तरीही काही जवळील आप्तेष्ट, नातेवाईक भेटवस्तू व आहेर आणतात. मात्र, आहेरांच्या पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त जीएसटीवरील खर्च होत आहे. त्यामुळे खरा आहेर शासनाच्या तिजोरीतच जमा होत आहे.
असा होतो जीएसटीवर खर्चसेवा प्रकार - आकारणारे मूल्य - जीएसटी- रक्कममंगल कार्यालय - २,५०,०००-१८-४५,०००-पत्रिका - २०,०००- १८-३,६००-जेवण- २,००,०००-०५-१०,०००-दागिने - ३,००,०००-०३-९,०००-कपडे - १,२५,०००-१२- १५,०००-सजावट - ७५,०००-१८-१३,५००-फोटोग्राफी - १,००,०००-०५- ५,०००-रुखवत साहित्य - २,००,०००- ०५-१०,०००