पिंपरी : कोरोना महामारी व लाॅकडाऊनमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस (sinhgad express) सोमवारपासून (दि. १८) सुरू करण्यात आली. चिंचवडरेल्वे स्थानकात सकाळी सव्वासहाला प्रवाशांनी या गाडीचे स्वागत करून जल्लोष केला. ही गाडी बंद असल्याने प्रवाशांची फरफट होत होती. त्याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
पिंपरी-चिंचवडरेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ईक्बाल मुलाणी, दीपक शेगर, गौतम मोरे, सिद्धार्थ ऊबाळे, बबन साबळे, अशोक कोयारी, यादव बोरोले, शैलेंद्र पांडेय, रवींद्र सरदेसाई, विनायक कुलकर्णी व प्रवाशी उपस्थित होते. शहरातील दीड हजारावर प्रवासी दररोज मुंबईला ये-जा करतात. यातील बहुतांशजण चाकरमाने आहेत. एमआयडीसीतील कंपन्या, खासगी कार्यालये तसेच काही शासकीय कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे रेल्वे सेवा खंडीत झाली. तेव्हापासून सिंहगड एक्सप्रेस बंद होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही पूर्ण क्षमतेने रेल्वे सेवा सुरू झाली नाही. काही गाड्या पुणे येथून सुरू झाल्या. मात्र त्यांना पिंपरी-चिंचवड शहरातील रेल्वे स्थानकांवर थांबा नसल्याने शहरातील प्रवाशांना पुणे किंवा लोणावळा रेल्वे स्टेशन गाठावे लागत होते. त्यात प्रवाशांचा वेळ व पैसा खर्च होत होता.
मोटरमनचा सन्मान-
चिंचवड रेल्वे स्टेशन येथे सिंहगड एक्सप्रेस दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड प्रवासी संघातर्फे फुलांची उधळण करण्यात आली. मोटरमनला पेढे भरवून शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच प्रवाशांना गुलाबपुष्प देत त्यांचे स्वागत केले.
सिंहगड एक्सप्रेस सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवड शहर व उपनगरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मुंबई येथून सायंकाळी ही एक्सप्रेस प्रवाशांच्या सोयीच्या वेळेत सोडण्यात यावी, अशी मागणी करणार आहे. - ईक्बाल मुलाणी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघ