'बारामतीत भाजपचे स्वागत...! बघू जनता कोणाला कौल देते; अजित पवारांचे प्रत्युत्तर
By विश्वास मोरे | Published: September 8, 2022 05:36 PM2022-09-08T17:36:36+5:302022-09-08T17:37:03+5:30
पावसाने शेतकरी वर्गाचे नुकसान केले असून सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे
पिंपरी : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मी गणेश मंडळांना भेटी देत नाही. आजही कोणालाही माहिती नाही की निवडणुका कधी होतील, कधी आहेत. त्यामुळे मी कुठल्याही गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नाही. बारामतीत त्यांचे स्वागत आहे. बघू बारामतीची जनता कोणाला कौल देते, असे उत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपच्या मिशन बारामतीवर दिले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळांच्या भेटीसाठी पवार गुरुवारी शहरात आले आहेत. काळेवाडी येथील श्री कृष्ण मंदिराच्या भेटीपासून दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या दौ-याला सुरुवात झाली. रात्री साडेनऊ पर्यंत ते गणेश मंडळांना भेटी देणार आहेत.
अजित पवार म्हणाले, दोन वर्ष कोरोनाच्या काळात सार्वजनिक उत्सवात कोणाला भाग घेता आला नाही. साधेपणाने सण साजरा करावे लागले. काल मुंबईतील महत्वाच्या काही गणेश मंडळांना भेटी दिल्या. आज दुपारपासून पिंपरी-चिंचवडमधील मंडळांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यातून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी होतात. मंडळांनाही चांगले वाटते. मला पण एक समाधान मिळते.''
पवार म्हणाले, ''महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन माझा दौरा नाही. आजही कोणालाही माहिती नाही की निवडणुका कधी होतील. मी कुठल्याही गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नाही. हा माझा स्वभाव नाही. पिंपरी-चिंचवडने अनेक वर्ष मला अतोनात प्रेम दिले आहे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच या भागातूनच झाली. तेव्हापासून या सगळ्या जनतेशी माझा संबंध आहे. मी कधीही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन असले कार्यक्रम करत नसतो. मी माझ्या श्रद्धेपोटी, समाधान मिळते. कार्यकर्ते भेटतात म्हणून मी गणेशमंडळांना भेटी देत आहे.''
सरकारने शेतक-यांच्या पाठिशी उभे रहावे
पवार म्हणाले, ''मी बाप्पाला काहीही साकडे घातले नाही. ज्यावेळेस आपली एखाद्या ठिकाणी श्रद्धा, भक्ती, आपण तिथे नतमस्तक होणासाठी जातो. त्यावेळेस प्रत्येकाने तिथे जाऊन साकडेच घातले पाहिजे असे नाही. दरवर्षी आनंदाने साजरा होणारा हा सण आहे. मध्ये मर्यादा पडल्या होत्या. आता मात्र पुन्हा नव्या जोमाने, उत्हासाने सगळे गणेशोत्सवात सहभागी झाले आहेत. पाऊस पण समाधानकारक पडला आहे. पण, पावसाने शेतकरी वर्गाचे नुकसानही केलेले आहे. कालपण कोकणसह काही भागात जोराचा पाऊस झाला आहे. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्यांना उभे करायचे, सावरायचे असते. त्यांना मदत करायची असते. सरकारने शेतक-यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे.''