नम्रता फडणीसपुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे संपादित करण्यात आलेली ’महाभारत’ची चिकित्सक आवृत्ती ही जगभरामध्ये प्रमाणित मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या आवृत्तीला संशोधक व अभ्यासकांकडून असलेल्या मागणीची दखल घेत संस्थेने महाभारत चिकित्सक आवृत्तीच्या १९ खंडांचे पुनर्मुद्रण केले. ही महाभारताची चिकित्सक आवृत्ती संशोधक, अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. अवघ्या सात महिन्यामध्येच या आवृत्तीच्या विक्रीमध्ये दुप्प्पट वाढ झाली आहे. या आवृत्तीच्या विक्रीमधून संस्थेला १२ लाख ७६ हजार १२९ रूपये इतकी रक्कम मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर च्या १९१७ साली झालेल्या स्थापनेनंतर ‘महाभारता’च्या प्रकल्पाला प्रारंभ करण्यात आला. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी अनेक प्रकाशित पोथ्या वाचून त्याची वर्गवारी करून संशोधनाच्या शास्त्रीय पद्धतीद्वारे महाभारताचा पहिला खंड १९४१ मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर दुसरा खंड १९४३ मध्ये प्रसिद्ध झाला. या दोन्ही खंडाचे संपादन व्ही.एस सुकथनकर यांनी केले होते. टप्प्याटप्प्याने डॉ. दांडेकर आणि डॉ. मेहेंदळे यांसारख्या अनेक नामवंत विद्वानांच्या सहभागातून महाभारताच्या १९ खंडाची निर्मिती झाली. शेवटचा खंड श्रीपादकृष्ण बेलवलकर यांच्या संपादकीय मार्गदर्शनातून १९६६ मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार श्रीमान महाभारतम (इंट्रोडक्टरी), आदीपर्व ,सभापर्व, अरण्यकपर्व, विरतापर्व, उद्योगपर्व, भिष्मापर्व, द्रोणपर्व, कर्णपर्व, शल्यपर्व, सौपतिकापर्व, स्त्रीपर्व, शांतीपर्व, अनुशासनपर्व, अश्वमेधिकापर्व, आश्रमावासिकापर्व, मौसलापर्व, महाप्रस्थानिकापर्व आणि स्वर्गारोहणपर्व असे १९ खंड अभ्यासकांना उपलब्ध झाले.
याविषयी माहिती देताना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे उपाध्यक्ष हरी नरके ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, भांडारकर इन्स्टिट़्यूटने शताब्दीकाळातअनेक महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले. ज्याद्वारे देशविदेशात संस्थेचा नावलौकिक वाढला. त्यामध्ये ‘महाभारत’च्या चिकित्सक आवृत्तीचा समावेश आहे. देशविदेशासह ३१६ भाषांमधल्या महाभारताच्या १६०० प्रती एकत्रित करून त्यातील ८०० जुन्या पोथ्या घेऊन त्या पोथीतल्या प्रत्येक शब्दाचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. लाखो श्लोक आणि शब्दांचा यथासांग अभ्यास करून मूळ महाभारताची १९ खंडांमध्ये आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. या चिकित्सक आवृत्ती शिवाय त्याची अंतिम संहिताही पाच खंडांमध्ये प्रकाशित करून संशोधक, अभ्यासकांना उपलब्ध करून दिली.‘महाभारत’ ची संहिता मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणारभांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने काढलेली महाभारताची संहिता ही संस्कृत भाषेमध्ये आहे. लवकरच ती प्रमाण मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. पा.वा काणे यांनी लिहिलेला ’धर्मशास्त्राचा इतिहास’ हा संपूर्ण ग्रंथ देखील मराठीमध्ये वाचायला मिळणार असल्याचे हरी नरके यांनी सांगितले.चिकित्सक आवृत्ती म्हणजे काय ?४‘महाभारत’च्या अनेक आवृत्त्या निघाल्या, त्यामध्ये मुख्यत्वे बॉम्बे आणि कलकत्ता आवृत्यांचा समावेश होता. काही पोथ्यांच्या आधारे त्या आवृत्या काढण्यात आल्या, त्यातला काही भाग कॉमन, काही धार्मिक आहे त्यातला कुठला भाग सत्य आणि अचूक आहे हा प्रश्न आहे.४भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने संशोधन करून १६०० पोथ्यांपैकी ८०० पोथ्या निवडल्या. त्या पोथीमधला जो साधारण भाग अभ्यासातून वाटला तो काढून टाकला. महाभारत आणि पुराणामध्ये अनेक गोष्टी घुसडल्या आहेत, त्या मुळातल्या महाभारतातल्या नाहीत.४जयसंहिता, महाभारत आणि पुषदयसंस्करण असे त्याचे भाग आहेत, हे पुषदयसंस्करण म्हणजे महाभारत आहे. त्यामध्ये १ लाख श्लोक मांडण्याची पद्धत आहे. भांडारकरने छापलेल्या चिकित्सक आवृत्तीमध्ये ८५ हजार श्लोक आहेत. काही आवृत्त्यांमध्ये ते कमी किंवा जास्त दिसतात.उदा: द्रौपदी वस्त्रहरण’ ही कथा सर्वश्रृत आहे. मात्र महाभारतात ‘वस्त्रहरण’ शब्द नाहीच आहे. तिथे ’वस्त्राकर्षण’ हा शब्द आहे, वस्त्र ओढण्याचा प्रयत्न केला असा त्याचा आशय आहे. चिकित्सक आवृत्तीमध्ये अशा काही गोष्टी वगळण्यात आल्या असल्याची माहिती भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी दिली.