पिंपरी: पिंपरी महापालिकेत गेल्या आठवड्यात भाजपातील चिंचवड विरूद्ध भोसरी गटबाजी चव्हाट्यावर आला होता. वाकडच्या विकासकामांवरून स्थायी समितीच्या सभेत भाजपातील ही गटबाजी समोर आली होती. त्यातप्रामुख्याने भोसरी विरूद्ध चिंचवड असे चित्र दिसून आले. अध्यक्ष संतोष लोंढे यांनी आयुक्तांना खुलासा करून न दिल्याने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक सहा सदस्यांनी गोंधळ, राडा घातला. सभागृहातील माईक, फोन, खुर्च्या आदी साहित्याची फोडतोड केली. त्यामुळे सत्ताधारी भाजपातील सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली होती .
स्थायी समितीच्या सभेत मागील आठवड्यात भाजपतील एका गटाने गोंधळ घातला होता. त्यामुळे आजच्या सभेत भांडणे होणार असल्याचे समजल्याने विरोधी पक्षांतील सदस्य हेल्मेट घालून आले होते. मात्र, सभेत कोणताही वाद झाला नाही. वाकडच्या विकास कामावरून स्थायी समितीच्या सभेत मागील आठवड्यात भाजपतील आमदार लक्ष्मण जगताप गटातील सहा सदस्यांनी गोंधळ घातला होता. तोडफोड केली होती.
त्यामुळे आजच्या सभेत भांडणे होणार असल्याचे समजल्याने विरोधी पक्षांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मयूर कलाटे, सुलक्षणा धर, पंकज भालेकर, पौर्णिमा सोनवणे,शिवसेना गटनेते राहुल कलाटे, हेल्मेट घालून आले होते. मात्र, सभेत कोणताही वाद झाला नाही.
शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांच्या वाकड प्रभागातील रस्ते विकासकामांवरून भाजपात धुसफूस सुरू आहे. राज्य शासनाने या विषयांसंदर्भात निर्णय दिल्याने, तसेच भाजपातील भोसरीच्या गटाने रस्ते विकासाला पाठबळ दिल्याने चिंचवड विरूद्ध भोसरी असा संघर्ष सुरू झाला आहे.