तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात खून, लुटमार, जबरी चोरी व दरोड्याचे सत्र सुरू असून, सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. तालुक्यातील गुन्हेगारीचा हा वाढता आलेख रोखणे पोलीस खात्यापुढे मोठे आव्हान आहे. चोरटे आणि दरोडेखोरांच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळणे गरजेचे आहे. धामणे येथील फाले कुटुंबीयांवर मंगळवारी ओढवलेला दरोड्याचा प्रकार म्हणजे तळेगाव पोलिसांची अकार्यक्षमता वेशीला टांगल्यागतच जमा आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये दारुंब्रे येथील वाघोले वस्तीजवळ जडी-बुटीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या तंबूत घुसून सहा दरोडेखोरांनी चाकुुचा धाक दाखवून, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत सव्वालाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले. मंगळवारी ७ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास दरोड्याचा हा प्रकार घडला. लुटमारीसाठी दरोडेखोरांनी युको गाडीचा वापर केला. या संदर्भात रुमाबाई चितोडिया यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही पोलिसांना या दरोड्याचा तपास लावता आला नाही. पोलिसांचा चोरट्यांवर वचक राहिलेला दिसत नाही. मंगळवारी पहाटे धामणे येथे सशस्त्र दरोड्यात फाले परिवारातील तीन निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. योगायोग म्हणजे दारुंब्रे व धामणे येथे पडलेले दरोडे मंगळवारी पहाटे पडलेले आहेत. दरोडेखोरांना पायबंद घालणे पोलिसांपुढील मोठी डोकेदुखी ठरत आहे. तालुक्यातील वाढत्या चोऱ्या, हत्या, खून व दरोडे हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. तालुक्यातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य माणूस धास्तावला गेला आहे. माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची पूर्ववैमनस्यातून भर दिवसा झालेली निर्घृण हत्या तालुका विसरलेला नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये चेतन दत्तात्रय पिंजण (वय १७) या इंद्रायणी महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्याच दोन मित्रांनी किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून महाविद्यालय परिसरात भरदिवसा खून केला. तालुक्यातील गुन्हेगारी व हिंसक प्रवृत्तीत दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंतनीय बाब बनली आहे. तालुक्यात गुन्हेगारीचे जाळेच पसरले आहे. लुटमार, खून, हत्या यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तालुक्यातील वातावरण दूषित झाले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. सध्या मावळला निकोप वातावरणाची गरज आहे. युवा पिढी बिघडू लागल्याने समाजाची मोठी हानी होणार आहे. मावळात जमीन व्यवहारातून आर्थिक सुबत्ता आलेली आहे. एकत्र कुटुंबपद्धती इतिहास जमा होऊ लागली आहे. जमिनीचे तुकडीकरण वाढले. जमीन तुकड्याला सोन्याचा भाव मिळू लागला आहे. सद्या युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. सशक्त लोकशाहीसाठी निकोप वातावरणाची गरज आहे.स्वस्तात आणि विनासायास पिस्तूल मिळत असल्याने तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही जण मध्य प्रदेश आणि बिहार या सारख्या परराज्यांतून पिस्तुलांसह घातक शस्त्रांची आयात करत असल्याची चर्चा आहे. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला मावळ तालुका भयमुक्त होणे काळाची गरज आहे. (वार्ताहर)
गुन्हेगारांना पकडणार कधी?
By admin | Published: April 26, 2017 3:47 AM