पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर पुणेकरांना नवीन नाहीत. मुळचे पुण्याचे असलेले जावडेकर सध्या केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीत कारभार बघत आहेत. त्यांना कायमच हसमुख आणि प्रसन्न मुद्रेतच पुणेकरांनी बघितले आहे. त्याच जावडेकर यांचा संताप शुक्रवारी पिंपरी चिंचवड येथे अनुभवायला मिळाला.
त्याचे झाले असे की, जावडेकर हे नेहमी वेळेत ठरलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी ठरलेल्या वेळेनुसार जय हिंद हायस्कुलच्या नव्या इमारतीच्या उदघाटन समारंभाला बरोबर पावणे सहा वाजता हजेरी लावली. ते पोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कोणी उपस्थित नव्हते ना कार्यक्रमाची तयारी झाली होती. हा सर्व प्रकार बघून त्यांनी मी संतापाने मी आलोच सांगत परतणे पसंत केले. मात्र वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या समोर आल्या आणि जावडेकर यांना आग्रहाने थांबवले.
आतमध्ये कार्यक्रम सुरु झाल्यावर काही वेळात पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप आले. मात्र त्यांनी स्वतःचे भाषण संपताच इफ्तार पार्टीला जायचे आहे सांगत निघून जाणे पसंत केले. एवढेच नाही तर भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीही एक एक करत बाहेर पडण्यास सुरुवात केली. अखेर शाळेचे शिक्षक, कर्मचारी यांच्या उपस्थितीत जावडेकर यांना भाषण करावे लागले.