तळवडे : शाळेत वेळेत पोहचण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्नशील असतो. पण, शाळेत पोहचण्यास रस्त्यावरील रहदारी, रोजची वाहतूककोंडी यात विद्यार्थी अडकून पडतात. बहुतांशी विद्यार्थी वेळेत पोहचता यावे यासाठी घरून लवकर निघत असतात. शाळा सुटल्यावरही वाहतूककोंडीत अडकून पडल्याने विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मनस्ताप वाढत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे.त्रिवेणीनगर, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, रुपीनगर, सहयोगनगर आदी भागातील विद्यार्थी यमुनानगर येथील शिवभूमी विद्यालय, तसेच मॉडर्न विद्यालयात शिक्षण घेत आहेत. या परिसरातील विद्यार्थ्यांना त्रिवेणीनगर चौकातून प्रवास करावा लागतो. या चौकातील सिग्नल कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. या ठिकाणी निगडी ते तळवडे मार्गावर छोटी-मोठी प्रवासी वाहने, मालवाहतूक करणाऱ्या मोटारी तसेच कंटेनर्स यांची सकाळ, संध्याकाळच्या वेळेत मोठी वर्दळ असते. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत चौक पार करताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांनाही सदर रस्ता ओलांडून जाणे जिवावरचे संकट असल्यासारखे वाटते. विद्यार्थ्यांना ओलांडून जाणे सोयीचे व्हावे, यासाठी वाहनचालक थांबण्याचे सौजन्य दाखवत नाहीत. पर्यायाने विद्यार्थी वाहनांच्या रांगेत घुसून रस्ता ओलांडतात. तळवडे येथील राजा शिवछत्रपती विद्यालयात तळवडे गावठाण, देहूगाव, विठ्ठलवाडी, शेलारवस्ती आदी भागांतून विद्यार्थी येत असतात. देहू, आळंदी रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. (वार्ताहर)
वाहतूककोंडीची शाळा सुटणार कधी?
By admin | Published: November 18, 2016 4:53 AM