पिंपरी: शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असते. मतदानासाठी सुट्टी दिली जाते. माझ्या मते ही सुट्टी द्यायला नाही पाहिजे. सुट्टी म्हंटले, इकडे तर लोणावळा, खंडाळा आणि माथेरान जवळच आहे, सुट्टी मिळाली की लोक मतदान करण्याऐवजी फिरायला जातात, नागरिकांनी मतदानाला प्राधान्य द्यावे, असे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी थेरगाव येथे व्यक्त केले.
थेरगाव येथे भाजपच्या वतीने सोसायटी धारकांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी दानवे बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी उपमहापौर झामाताई बारणे, अभिषेक बारणे, निलेश बारणे, विश्वजीत बारणे आदी उपस्थित होते.
दानवे म्हणाले, ''मतदानाची टक्केवारी शहरात कमी होतीय. आम्हीं गावी लोक भरून आणतो. लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणून टक्केवारी वाढवतो. शहरी परिसरात आपल्या भागामध्ये आयटी हब आला प्रगती झाली मात्र मतदानाबाबत काही प्रमाणात अनास्था दिसून येते. मतदानाला सुट्टी दिली जाते त्यामुळे नोकरदार वर्ग फिरायला जाण्याला पसंत करतात. चुकीचे आहे. प्रत्येकाने मतदान करायला हवे. माझ्या मते मतदानाच्या दिवशी सुट्टी नाहीं पाहिजे. प्रत्येक मताला महत्त्व आहे कारण एका मतावरून पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले होते.''
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, नियोजाअभावी मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पात हजार कोटी वाया घालण्याचे पाप राष्ट्रवादी काँगेस ने केले आहे. एखादा प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणे गरजेचे असते. शेतकऱ्यांच्या भावना जाणून न घेताच प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केल्याने विरोध झाला. हा प्रश्न संवाद आणि चर्चेतून सोडविता आला असता. मात्र, जलवाहिनी प्रकल्प दामटून नेण्याचा प्रयत्न तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केला.''