पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती धनंजय भालेकर आणि उपसभापती श्याम आगरवाल यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या गटाला सभापतिपदाची संधी मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. साहित्य खरेदीमुळे सतत चर्चेत असणाऱ्या शिक्षण मंडळातील विद्यमान सभापती आणि उपसभापतींनी अन्य सहकाऱ्यांना संधी मिळावी, या उद्देशाने सहा महिन्यांत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या दोन्ही पदांवर कोणाला संधी मिळणार, याबाबतची चर्चा महापालिका आणि शिक्षण वर्तुळात रंगू लागली आहे. शिक्षण मंडळात लोकनियुक्त १०, शासन नियुक्त दोन असे एकूण १२ सदस्य आहेत. त्यात राष्ट्रवादीचे विजय लोखंडे, लता ओव्हाळ, धनंजय भालेकर, फजल शेख, नाना शिवले, शिरीष जाधव, चेतन भुजबळ, चेतन घुले, सविता खुळे, निवृत्ती शिंदे, काँग्रेसचे विष्णुपंत नेवाळे आणि श्याम आगरवाल यांचा समावेश आहे. त्यापैकी पहिल्या वर्षी विजय लोखंडे यांना सभापती आणि लता ओव्हाळ यांना उपसभापतिपदी संधी मिळाली. त्यानंतर फजल शेख आणि सविता खुळे यांना संधी मिळाली. दरम्यान, याच कालखंडात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होत्या. तसेच फजल शेख यांच्या राजीनाम्याचे नाट्यही काही महिने रंगले. मात्र, राष्ट्रवादीतील एका गटाने उठाव केल्याने निवडणूक झाली आणि भालेकर आणि आगरवाल यांना संधी मिळाली. सहा महिन्यांत त्यांनी राजीनामा दिला. (प्रतिनिधी)
कोणत्या गटाची लागणार वर्णी?
By admin | Published: October 03, 2015 1:25 AM