पिंपरी : आरक्षणासाठी मराठा समाजाने सुरू केलेले आंदोलन आता तीव्र झाले आहे. उपोषणाच्या जागी नेत्यांना गावबंदी आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व स्थानिक सदस्यांच्या राजीनाम्याने घेतली आहे. आता हे लोण आमदारकीपर्यंत पोहोचत आहे. पिंपरी-चिंचवडमधील मराठा आमदार असलेले भाजपचे महेश लांडगे, अश्विनी जगताप तर राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे, सुनील शेळके तर शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शहरातील सकल मराठा समाजाने केली आहे.
खासदार हेमंत पाटील यांच्यानंतर आता अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. माझ्या तालुक्यातील समाजबांधव आणि मराठा समाजाच्या संघटना जसे सांगतील तसा निर्णय मी घेणार आहे. त्यांनी राजीनामा द्यायला सांगितला तर माझी राजीनामा द्यायची तयारी आहे, असे विधान आमदार अतुल बेनके यांनी केले आहे. त्यामुळे ते आमदार राजीनामा देऊ शकतात, तर तुम्ही का नाही, म्हणत शहरातील मराठा समाजाने आमदारांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
नेत्यांना शहरबंदी...मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात पुढाऱ्यांना शहरबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे काही राजकीय नेत्यांनी त्याचा धसका घेत कार्यक्रमाला येण्याचे टाळले. रविवारपासून विविध उपनगरांमध्ये साखळी उपोषणही करण्यात येत आहे.
शासनाचा दशक्रिया विधी...मराठा समाजातर्फे इतका उद्रेक होऊनही प्रशासन जागरूक होत नाही. त्यामुळे शासनाचा दशक्रिया विधी सकल मराठा समाजातर्फे आज (दि. ३१) करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा समाजाचे चार आमदार व एक खासदार आहेत. त्यात खुद्द भाजपचे दोन आमदार आहेत तर शिंदे गटाचे एक खासदार आहेत. त्यांच्या घरांसमोर १ नोव्हेंबरपासून काळे झेंडे दाखवून निदर्शन करण्यात येणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर आंदोलन पेटली आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड, मावळमधील आमदार व खासदार याच्यावर ब्र ही काढायला तयार नाहीत. त्यांनी समाजासोबत राहणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांना समाजाचे काहीही घेणेदेणे नसल्याचे दिसते.
- सतीश काळे, सकल मराठा समाज