पिंपरी : कोरोनाच्या आपत्तीत मास्क खरेदीच्या माध्यमातून इष्टपाती साधणाऱ्याचे काम सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादीने केले असून मास्क खरेदीची चौकशी सुरू असतानाच स्थायी समितीने बुधवारी एक कोटी ७० लाखांच्या विषयास मंजूरी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने उपाययोजना म्हणून नागरिकांना मास्क वितरीत करण्याची टूम सत्ताधारी भाजपाने काढली होती. त्यानंतर शहरातील बचत गटांना काम देण्याच्या नावाखाली सत्ताधारी भाजपा आणि विरोधीपक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या १३ बचत गट आणि संस्थांना काम दिले होते. याचा पोलखोल ‘लोकमत’ ने केला होता. ‘कोरोनाच्या संकटात सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादीला एक कोटी सत्तर लाखांची खिरापत’असे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर मास्कचा दर्जा आणि मास्कमधील अर्थकारण यावरही प्रकाश टाकला होता. या प्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. विषयाच्या अनुषंगाने विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मास्क खरेदीच्या हल्लाबोल केला. गैरव्यवहाराची चौकशी करावी, फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी,अशी विरोधकांनी जोरदार मागणी केली होती. तसेच निकृष्ट दर्जाचे मास्क पुरविणाऱ्या महिला बचत आणि विविध संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनाही केली होती. त्यावर मास्कच्या दर्जाची चौकशी करून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.त्यानंतर मास्क खरेदीचा विषय कार्योत्तर मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर आला होता. त्यावेळी या विषयावर चर्चा झाली. हा विषय मंजूर करण्याचे धोरण सत्ताधाऱ्यांचे असल्याने शिवसेनेने त्यास विरोध नोंदविला. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली. तसेच सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, त्यामुळे विषयाबाबत स्थायीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली. शिवसेनेने केलेल्या विरोधाला न जुमानता स्थायी समितीने हा विषय मंजूर केला.स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे म्हणाले, कोरोनाच्या काळात उपाययोजनासाठी काही निर्णय घेतले आहेत. विषय मंजूर केला असला तरी चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरही कारवाई करता येते. हा विषय मंजूर करण्याच्या सूचना मला होत्या. त्यानुसार विषय मंजूर केला आहे.
पुरावे गोळा करण्याचे काम पूर्णमास्क खरेदीप्रकरण 'लोकमत' ने उघडकीस आणल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यात अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, मुख्य लेखापाल कोळंबे, प्रशासन अधिकारी मनोज लोणकर यांचा समावेश आहे. समितीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून विषयास मंजूरी दिल्यानंतर भांडार विभागाकडून केलेली कार्यवाही, मास्क निर्मिती प्रक्रिया, वितरण अशा प्रक्रियांची माहिती घेतली जात आहे. कागदपत्रे तपासण्याचे काम सुरू आहे, असे प्रशासन अधिकारी लोणकर यांनी सांगितले. पुढील आठवड्यात याबाबतचा अहवाल प्राप्त होईल, असेही नमूद केले आहे..............राष्ट्रवादी काँग्रेस मूग गिळूनमास्क खरेदी प्रकरणात सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस मूग गिळूनवादी काँग्रेसने गोंधळ घातला होता. माजी महापौर मंगला कदम यांनी हल्लाबोल केले होते. त्यानंतर चौकशी समिती नियुक्त केली होती. मात्र, आज स्थायी समितीसमोर विषय आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही भूमिका घेतली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.