पिंपरी : कपाटातून कपडे काढताना पिस्तूल खाली पडले आणि पिस्तुलातून गोळी सुटली. पिस्तुलातून सुटलेली गोळी तरुणाच्या आईच्या पायाला लागली. त्यामुळे त्या जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी (दि. २४) रात्री ११ वाजता मिडास रेसिडेन्सी, कचरा डेपोसमोर, देहूगाव येथे घडली. लता मराठे असे जखमी महिलेचे नाव आहे. पोलीस किशोर दुतोंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता यांचा मुलगा अक्षय शांताराम मराठे (२६, रा. मिडास रेसिडेन्सी, कचरा डेपोसमोर, देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
अक्षयकडे परवानाधारक पिस्तूल आहे. ते त्यांनी त्यांच्या कपड्यांच्या कपाटात ठेवले होते. त्यांना मंगळवारी रात्री बाहेरगावी जायचे असल्याने ते टी-शर्ट घालण्यासाठी शोधत होते. मात्र, टी-शर्ट मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्या आईला आवाज दिला आणि टी-शर्ट शोधण्यास सांगितले.
अक्षय हा कपाटातून त्याचा ड्रेस ओढून बाहेर काढत असताना कपड्यांवर ठेवलेले पिस्तूल खाली पडले आणि त्यातून एक गोळी सुटली. ही गोळी आई लता यांच्या पायाला लागली. यात लता जखमी झाल्या. अक्षय याने सुरक्षितता धोक्यात येईल, अशी कृती केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.