पिंपरी : सोशल मीडियातून व्यक्त होताना अनेकांचा ‘तोल’ जातो. आक्षेपार्ह, धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य किंवा पोस्ट केल्या जातात. व्हाॅट्सॲपवर अशा पोस्ट सर्रास दिसून येतात. त्यामुळे इतरांच्या भावना दुखावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे सायबर पोलिसांचे सोशल मीडियावरील पोस्टवर ‘वाॅच’ ठेवण्यात येत आहे. तसेच अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईदेखील केली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये २२ तक्रारी आल्या आहेत.
सोशल कनेक्टिव्हिटी, व्यावसायिक व मनोरंजनाचे साधन म्हणून व्हाॅट्सॲपचा वापर केला जात असला तरी त्याचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही आहेत. मात्र, याबाबत अनेकजण अनभिज्ञ असल्याचे तसेच याबाबतच्या नियम, कायदा याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच कोणत्याही प्रकारच्या पोस्ट, स्टेटस ठेवले जाते. यातून इतरांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो.
धार्मिक तेढ, प्रक्षोभक वक्तव्य पडेल महागात
काही जणांकडून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टे शेअर केल्या जातात. काहीजण प्रक्षोभक वक्तव्य करतात. अशा व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. गुन्हा दाखल केला जातो.
दहशतीसाठी वापर
काही जणांकडून अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल केले जातात. फोटो माॅर्फ करून किंवा अश्लील एडिट करून शेअर केले जातात. यातून संबंधित व्यक्तीला धमकावणे, दहशहतीत ठेवणे तसेच त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो.
या गोष्टी टाळा
कोणतीही पोस्ट, फोटो, व्हिडिओ याबाबत पूर्ण माहिती न घेता त्या शेअर किंवा व्हायरल करू नयेत. अपूर्ण माहिती असल्यास पोस्टला प्रतिसाद देऊ नये. कोणाच्या भावाना दुखावतील अशी वक्तव्ये किंवा पोस्ट करू नये. अनोळखी लिंक, फोटो, व्हिडिओ आदी डाऊनलोड करू नये. सेटिंग ॲटो डाऊनलोड असल्यास बदलून घ्यावे.
ग्रुप ॲडमिन आहात, ही पथ्ये पाळा
व्हाॅट्सॲप ग्रुपचे ॲडमिन असल्यास काही खबरदारी घ्यावी लागते. आपल्या ग्रुपचे उद्देश, त्याची आचारसंहिता याबाबत ग्रुपमधील सर्व सदस्यांना माहिती देणे आणि त्याचे पालन करण्याची सूचना द्यावी. आक्षेपार्ह किंवा चुकीची पोस्ट वाटल्यास संबंधित सदस्याला ग्रुपमधून ‘रिमूव्ह’ केले पाहिजे. तसेच ग्रुपचे सेटिंगमध्ये ‘ओन्ली ॲडमिन’ करावे. त्यामुळे अशा पोस्टवरून वाद टाळता येईल.