पिंपळे गुरव : सत्ताधारी पक्षात राहून वेळप्रसंगी सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी पक्षाचा ‘व्हिप’ नाकारण्याचे धाडस नगरसेवक संजय (नाना) काटे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात दाखविले. अशा गरिबांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या सुशिक्षित उमेदवारासह प्रभाग क्र. ३० मधून शिवसेनेच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. दापोडी-कासारवाडी प्रभाग क्र. ३० मधील शिवसेनेचे उमेदवार नगरसेवक संजय (नाना) केशव काटे, छाया तुषार नवले, शुभांगी प्रवीण गायकवाड, गोपाळ प्रकाश मोरे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेत शिवसेना विभागप्रमुख तुषार नवले, हाजी शेख, उपविभागप्रमुख चंद्रकांत शिंदे, चंद्रकांत काटे पाटील, अर्जुन लांडगे, एकनाथ हाके, शंकर कुऱ्हाडकर, अनिल तारु, सुनील ओव्हाळ, शिवा कुऱ्हाडकर, राजू सोलापुरे, वामन कांबळे, जलाल शेख, मनोज उप्पार, बाळासाहेब जगताळे, विलास अण्णा काटे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. खासदार बारणे पुढे म्हणाले, ‘‘महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या मानधन वाढीस सभागृहात नगरसेवक संजय (नाना) काटे यांनी सत्ताधारी पक्षात असतानादेखील प्रखर विरोध केला. शहरातील कष्टकरी,गोरगरीब करदात्या नागरिकांचे आर्थिक हित जपले. पक्षाचा व्हिप असतानाही त्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे आणि भले सत्तेत असलो, तरी चुकीच्या कामाला साथ देणार नाही असे सांगून सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करला. संजय (नाना) काटे यांच्या आग्रही भूमिकेमुळे पाशवी बहुमत असतानाही नगरसेवकांच्या मानधनवाढीचा हा विषय अखेर प्रशासनाला दप्तरी दाखल करावा लागला. तसेच महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा पॉलिसी देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. या ठरावालादेखील संजय काटे यांनी विरोध करण्याचे धाडस दाखविले. त्यांनी स्वत: आणि कुटुंबीयांसाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारी आरोग्य विमा पॉलिसी नाकारली. उलटपक्षी दापोडी, बोपखेल, फुगेवाडी परिसरातील रिक्षाचालकांसाठी आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वत:च्या खर्चाने आरोग्य विमा पॉलिसी सुरू करून दिली.’’असे दातृत्व दाखविणारा युवा कार्यकर्ता संजय (नाना) काटे आणि दापोडी - कासारवाडी प्रभाग क्र. ३० मधील शिवसेनेचे उमेदवार छाया तुषार नवले, शुभांगी प्रवीण गायकवाड, गोपाळ प्रकाश मोरे यांना बहुमतांनी मतदार निवडून देतील, अशी खात्री बारणे यांनी व्यक्त केली.
सामान्यांसाठी व्हिप नाकारले
By admin | Published: February 14, 2017 2:00 AM