- शिवप्रसाद डांगे , रहाटणीएखाद्याने नियमाचे उल्लघंन केले, तर ते वाहन वाहतूक पोलीस वाहतूक विभागात घेऊन जातात किंवा त्याच ठिकाणी दंडाची पावती फाडतात. मात्र रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात सांगवी वाहतूक विभागाचा अजब कारभार सुरू आहे. वाहन उचलून ते वाहतूक विभागात घेऊन न जाता सर्व वाहने साई चौकात बीआरटीएस रस्त्यात उतरविण्यात येतात. संबंधित वाहनचालकाकडून काही तरुणांकडून मनाप्रमाणे रक्कम वसूल केली जात आहे. मात्र, दंड वसूल करणारे हे तरुण नेमके कोण आहेत, हे कोणालाच माहिती नाही. वाहनचालकांकडून राजरोसपणे दंड वसूल केला जात आहे. वाहतूक विभागाशी कोणताही संबंध नसणाऱ्या व्यक्ती दंडवसुली, कागदपत्रे तपासणे, परवाना तपासणे आदी कामे करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाकडून याला लगाम घातला जाईल काय, हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार शिवार चौक, कोकणे चौक, साई चौक व कुणाल आयकॉन रस्त्यावर सम व विषम तारखेला पार्किंगचे फलक लावण्यात आले. हा परिसर सांगवी वाहतूक विभागाच्या आधिपत्याखाली येतो. त्यामुळे या विभागाचे एक पोलीस वाहन, गाड्या उचलण्यासाठी पाच ते सहा मुले व एक टेम्पो नेमण्यात आले. वाहन उचलताना चालक हजर नसेल, तर ते वाहन टेम्पोत टाकून जवळच्या साई चौकात नेले जाते. ती वाहने येथे हवाली केली जातात. आपले वाहन जागेवर नाही, हे लक्षात येताच वाहनचालक वाहन शोधतात. मात्र, वाहन मिळून येत नाही. नंतर कळते की, वाहन पोलिसांनी नेले आहे. साई चौकात बीआरटीएस रस्त्यात ठेवले आहे. तेथे गेल्यावर गाडीची चौकशी कोणाकडे करायची, विचार करण्याच्या आत काय पाहिजे, गाडी नंबर काय, अशी विचारणा येथील काही तरुणांकडून केली जाते. लगेच कागदपत्रांची मागणी केली जाते. तातडीने त्यांच्याकडून किती दंड होईल, याची माहिती देण्यात येते. दंडाची रक्कम सांगताच वाहनचालकाच्या पायाखालची जमीनच सरकते. हे सर्व सुरू असताना दुसऱ्या तरुणाकडून तडजोड करण्यासाठी विचारणा केली जाते. १०० पासून ते २ हजारापर्यंत मागणी केली जाते. एखादा वाहनचालक चढ्या आवाजात बोलला, तर एक रुपयाही न घेता त्याला सोडून देण्यात येते. कोणी गयावया केली, तर त्याच्याकडून हजारो रुपये उकळले जात आहेत. काही दिवसांपासून सांगवी वाहतूक विभागाने शिवार चौक परिसरात ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, दंडाची पावती न देता काही तरुण दंडवसुली करीत आहे. त्या तरुणांनी मला सर्व कागदपत्रे असताना एक हजार दंड सांगितला होता. कसेबसे ५०० रुपये देऊन सुटका करून घेतली. नको ती भानगड म्हणून मी याकडे दुर्लक्ष केले; परंतु दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच आहे. ही सर्व मांडवली साई चौकातच होते. - अविनाश गायकवाड, एक वाहनचालक
दंड वसूल करणारे नेमके कोण?
By admin | Published: September 06, 2015 3:30 AM