रावेत : गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या, तसेच उपनगरांच्या विविध भागांत बेवारस अवस्थेत आढळणा-या वाहनांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. बेवारस वाहनांच्या संख्येने आता शेकडा पार केला आहे. दुचाकी, रिक्षा, कार, हलकी, तसेच जड वाहने रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेमध्ये बेवारसपणे धूळखात, गंजलेल्या अवस्थेत आहेत. ही वाहने गेली अनेक दिवस त्याच स्थितीत दिसून येत आहेत. या वाहनांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रस्त्यालगत अथवा मोकळ्या जागेवरील उभ्या बेवारस वाहनांमुळे समस्या वाढू लागल्या आहेत. ही वाहने एखाद्या गुन्ह्यात वापरल्यानंतर लपवण्याच्या उद्देशाने उभी केलेली असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे वर्षानुवर्षे रस्त्यालगत पडून असणाºया बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचापोलिसांनी प्रयत्नही केला; परंतु शहरात विविध ठिकाणी रस्त्यालगत बेवारस पडून असलेल्या वाहनांच्या शोधमोहिमेत पोलिसांना मोजक्याच गाड्यांचे मालक मिळाले. शोधमोहिमेत सातत्य नसल्याने अनेक बेवारस वाहनांचा उलगडा होऊ शकला नाही. सद्य:स्थितीला शहरात अनेक ठिकाणी अशी बेवारस वाहने उभी असल्याचे पाहायला मिळत आहे.रस्त्यालगत, पदपथावर, तसेच मोकळ्या मैदानात ही वाहने मोठ्या संख्येने उभी आहेत. त्यांपैकीबहुतांश वाहने वर्षानुवर्षे एकाच जागी पडून असतानाही ती हटवण्याचा प्रयत्न झालेला नाही, तर काही अपघातग्रस्त वाहने घटनास्थळीच पडून राहिल्याने त्यांचे टायर अथवा उपयुक्त पार्ट नाहीसे झालेले आहेत. अनेकदा वाहन हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची तक्रार देऊन विमा कंपनीकडून नफ्याची रक्कम लाटण्याच्या उद्देशाने देखील वाहने बेवारस स्थितीत अज्ञातस्थळी उभी केली जाण्याची शक्यता असते. अशी वाहने थोडीफार सुस्थितीत असतानाही त्याची ओळख पटू नये, याकरिता नंबर प्लेट काढलेली असते.पोलीस पथकांनी अशा वाहनांच्या चेसिजरून आरटीओकडून वाहनमालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानंतरही मालकाचा शोध न लागलेल्या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पोलिसांकडून पार पाडावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.बिजलीनगर स्पाइन रस्त्यावर अशाच प्रकारच्या लावण्यात आलेल्या एका मोटारीला काही महिन्यांपूर्वी आग लागून त्यामध्ये चारचाकी वाहन खाक झाले. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घेणे गरजेचे आहे. ही वाहने ताब्यात घेऊन तपासणी करणे आवश्यक आहे. बेवारस वाहनांचा उपयोग विघातक कार्यासाठी होऊ नये याकरिता नागरिकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे.>पोलिसांकडून व्हावी शोध मोहीमशहराच्या रावेत, वाल्हेकरवाडी, निगडी, आकुर्डी, चिंचवड, प्राधिकरण परिसरामध्ये बेवारस वाहने असल्याचे पाहणीत दिसून आले. रस्त्यालगत अथवा मोकळ्या जागेवरील उभ्या बेवारस वाहनांमुळे समस्या वाढू लागल्या आहेत. वर्षानुवर्षे रस्त्यालगत पडून असणाºया बेवारस वाहनांचा मालक कोण याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे.शहरात विविध ठिकाणी रस्त्यालगत बेवारस स्थितीमध्ये पडून असलेल्या वाहनांची शोधमोहीम पोलिसांतर्फे सुरू करणे आवश्यक आहे. रस्त्यालगत, पदपथावर, तसेच मोकळ्या मैदानात ही वाहने मोठ्या संख्येने उभी आहेत. मात्र, वर्षानुवर्षे ती हटवण्याचा प्रयत्न झालेला नाही.
शहरातील बेवारस वाहनांचा वाली कोण?, गंजलेल्या अवस्थेत उभ्या आहेत अनेक गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 1:35 AM