पिंपरी : कोण पार्थ पवार? ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांचा पुत्र, ही त्यांची ओळख आहे. पार्थच काय, कोणीही पवार माझ्या विरोधात लढण्यास आले, तरी मला फरक पडणार नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात माझा जनसंपर्क चांगला आहे. मला ओळख निर्माण करण्यासाठी बॅनरबाजी करण्याची आवश्यकता नाही, अशी टीका मावळचेशिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ आघाडीमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला आला आहे. सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार माजी महापौर आझम पानसरे व राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला आहे. मावळ मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘राष्ट्रवादी’ची ताकत असूनही अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची खेळी सुरू केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार स्वत: पार्थसोबत मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांनी मावळ मतदारसंघात होर्डिंग, फ्लेक्स व बॅनरबाजी केली. त्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांचा फोटो झळकला. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पत्रकार परिषदेत बारणे यांना विचारणा करण्यात आली. बारणे म्हणाले, ‘‘सध्या पार्थची ओळख अजित पवार यांचा पुत्र हीच आहे. त्याची ओळख निर्माण होण्यासाठी फ्लेक्स व बॅनरबाजी सुरू आहे. माझे मतदारसंघात काम असल्याने मला अशी बॅनरबाजी करण्याची आवश्यकता नाही. पवार घराण्याने महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी वाटून घेतले आहेत. लोकसभा शिरूरच्या जागेवर अजित पवार, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, मावळमध्ये पार्थ पवार आणि पुणे मतदारसंघातही त्यांच्या घराण्यातील कोणीतरी पवार इच्छुक आहे. परंतु, मला काही फरक पडत नाही. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला आहे. त्यानुसार माझी तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मी भाजपाकडून लढणार असल्याच्या वावड्या विरोधकांनी उठविल्या होत्या. परंतु, मावळ लोकसभा मतदारसंघातून मी शिवसेनेचाच उमेदवार असणार आहे.’’
मुख्यमंत्री यांचा शिवसेनेतर्फे निषेध पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विकास कामांच्या उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना कार्यक्रमात बोलण्याची संधी देण्यात आली. परंतु,शिवसेनेचे पिंपरी मतदार संघाचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दोन मिनिटे बोलण्याची विनवणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. तरीही त्यांना बोलण्यापासून रोखण्यात आले. या घटनेचे छायाचित्र व बातमी एकमेव दैनिक ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे व आमदार गौतम चाबुकस्वार यांनी कार्यक्रमात बोलू न दिल्याच्या घटनेचा निषेध करीत मुख्यमंत्री यांनी अन्याय केल्याची भावना गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली.