पिंपरी : नवऱ्याचा पाठलाग करताना चक्कर येऊन पडलेल्या महिलेला उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान महिलेचा शुक्रवारी (दि. १३) मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पिंपरी पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा भीमराव जोगदंड (वय २५, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई विजाबाई आनंद रोकडे (वय ५५, रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्या जबाबावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशा जोगदंड आणि त्यांचे पती भीमराव लक्ष्मण जोगदंड (वय ३०, मूळ रा. इंदापूर) यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर ते बारामती येथे रहात होते. मात्र दोन वर्षांपूर्वी ते पिंपरीगावात राहण्यास आले. पती भीमराव जोगदंड पिंपरी येथील एका बटाटा विक्रेत्याकडे हमालीचे काम करतो. आशा व भीमराव या दोघांना मूलबाळ नव्हते. त्यावरून या दोघांमध्ये सातत्योन वाद होत असत. यातून आशा यांनी २४ नोव्हेंबर रोजी पती भीमराव हरविले आहेत, अशी खबर पोलिसांना दिली. मात्र त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भीमराव पोलिसांपुढे हजर झाले. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी पतीकडील नातेवाईक त्यांच्या पिंपरी गावातील घरी आले होते. त्यानुसार दि. ७ डिसेंबर रोजी नातेवाईकांसह त्यांची बैठक झाली. मात्र, बैठकीत वाद झाल्याने नातेवाईक व पती भीमराव यांनी तेथून पळ काढला. मला तुमच्या सोबतच रहायचे आहे, तुम्ही मला सोडून जाऊ नका, असे पत्नी आशा यांनी पती भीमराव यांना सांगितले. मात्र भीमराव थांबले नाहीत. त्यांना थांबविण्यासाठी आशा यांनी त्यांचा पायी पाठलाग केला. पिंपरीगावातून त्यांच्या घरापासून शगुन चौकापर्यंत त्या पाठलाग करीत होत्या. त्यावेळी चक्कर येऊन आशा शगुन चौकात रस्त्यात पडल्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या आई विजाबाई यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेऊन जात होत्या. तेथे पोहचल्यानंतर आशा यांना रक्ताची उलटी झाली. त्यामुळे पोलीस ठाण्यात न जाता आशा यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्या बेशुद्ध झाल्या. तर शुक्रवारी (दि. १३) त्यांचा मृत्यू झाला.
नवऱ्याचा पाठलाग करणं महिलेच्या जीवावर बेतलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 9:45 PM
समझोत्याच्या बैठकीत वाद झाल्याने पतीने तेथून काढला होता पळ
ठळक मुद्देयाप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद