पिंपरी : पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नी आणि सासूने राडा घालत महिलेला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जागेच्या बांधकामावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. बावधन बुद्रुक, पुणे येथे २३ मार्च रोजी दुपारी अडीच ते साडेतीन या कालावधीत ही घटना घडली.
याप्रकरणी महिलेने शनिवारी (दि. २६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदोष मनुष्य वधाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी मायलेकी असलेल्या दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी बावधन येथे तिच्या आईकडे आली आहे. तिच्या वडिलांच्या नात्यातील एका कुटुंबियांशी जागेच्या बांधकामावरून वाद आहे. त्यातून फिर्यादी महिलेची सासू आरोपी महिलेच्या आईच्या घरी आली. आमच्या जागेत बांधकाम करू नका, असे फिर्यादीच्या सासूने आरोपी मायलेकींना सांगितले. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण केली. फिर्यादीच्या सासूला सोडविण्यासाठी फिर्यादीचे सासरे व पती गेले असता फिर्यादीच्या सासऱ्यांना आरोपींनी ढकलून दिले. त्यानंतर फिर्यादीची सासू आणि फिर्यादीचा पती हे दोघेजण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्यावेळी फिर्यादीचे आजारी सासरे आणि फिर्यादी महिला हे घरात असताना आरोपी मायलेकी तिथे आल्या. त्यांनी फिर्यादीला मोठा दगड फेकून मारला. या दगडामुळे फिर्यादीचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही हे कृत्य करीत आरोपींनी सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केला. फिर्यादीने तो दगड चुकविला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचे केस पकडून त्यांना गरागरा फिरविले. त्यांच्या तोंडावर चापटी मारून बुक्क्यांनी मारहाण केली. माझा नवरा पीएसआय आहे, तुला बघतेच, असे म्हणत आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला धमकावले. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके तपास करीत आहेत.