लोकमत न्यूज नेटवर्करावेत : पावसाच्या आगमनास काहीच दिवस शिल्लक आहेत. पावसाळ्यापूर्वी म्हणजे १ एप्रिलपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित असताना मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला, तरी नालेसफाईला प्रत्यक्षात सुरुवात झाली नसून, याला महापालिकेचे अधिकारीच जबाबदार आहेत. नालेसफाईच्या नावाखाली करदात्यांच्या पैशावर हात साफ केला जातो. वेळेत नालेसफाईचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.रावेत, वाल्हेकरवाडी, शिंदेवस्ती, राजयोग कॉलनी, गुरुद्वारा परिसर आदी भागासह शहरात जवळपास १९० नाले आहेत. बहुतांश नाल्यांमध्ये गवत, झाडे, झुडपे वाढल्यामुळे आणि कचरा साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. सतत पाणी साचून राहिल्यामुळे डासांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेतर्फे सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयामार्फत स्वतंत्र नालेसफाईचे कामकाज केले जाते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून नाल्याची सफाई न झाल्यामुळे या नाल्यातील पाणी साचून राहत आहे. रावेतसह इतर ठिकाणी असणाऱ्या नाल्यातील पाणी नदीला जाऊन मिळते. काही ठिकाणी नैसर्गिक नाला बुजविण्याकरिता नाल्याच्या शेजारी मातीचे मोठे ढिगारे घालण्यात आले आहेत. त्यामुळे नाल्याची रुंदी कमी झाली आहे अशा नाल्यात माती आल्याने हा नाला तुंबून दुर्गंधी येत आहे. रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक आदी भागातील नागरी वसाहतीत नैसर्गिक नाले असून, नाल्यांमध्ये परिसरातील नागरिक घाण व कचरा टाकतात. परंतु या नाल्यांची कधीही स्वच्छता होत नसल्याने त्यात कचऱ्याचे ढीगच तयार झाले आहे. महापालिकेने हे उघडे नाले साफसफाई करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यापूर्वी तरी नालेसफाई होणार का?
By admin | Published: May 11, 2017 4:35 AM