कामशेत : कामशेतसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील वीजपुरवठा कधी सुरळीत होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.मावळ तालुक्यातील मध्यवर्ती शहर कामशेतच्या आजूबाजूला अनेक गावे व वाड्यावस्त्या आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक लोक कामशेतमध्ये स्थायिक होत असल्याने शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. कामशेत येथील वीजवितरण मंडळ कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे ५० गावे येत असून ७५०० ग्राहक आहेत. या भागातील ६० ते ७० किलोमीटर लांबीच्या मुख्य वीज वाहिनीची दुरुस्ती व इतर अनेक कामांसाठी कर्मचारी अत्यंत कमी संख्येने आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार येत आहे. त्यामुळे बºयाचदा खंडित झालेला वीजपुरवठा वेळेवर पूर्ववत होत नाही. कार्यालयात एक कनिष्ठ उपअभियंता, दोन लाईनमॅन, दोन विद्युत सहायक व पाच आऊटसोर्सिंगचे तात्पुरत्या नेमणुकीवरील कर्मचारी आहेत. ग्राहकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी वर्ग कमी असल्याने येथील वीजविषयक समस्या गंभीर होत आहेत.कार्यालय क्षेत्रातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तसेच विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने येथे सब स्टेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कामशेत महावितरण कार्यालयातील अधिकाºयांनी वरिष्ठ पातळीवर समस्या मांडल्या. राणे या अधिकाºयांनी गतवर्षी जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या शेतकी फार्मची दोन एकर जागा सब स्टेशनसाठी मिळावी यासाठी संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजून विचार विनिमय सुरू आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास कामशेतसह ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न संपुष्टात येणार असल्याची माहिती राणे यांनी सांगितली. शिवाय कामशेत व परिसरातील राजकीय, सामाजिक व प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून कामशेतच्या वीजवितरण कार्यालयास मदत केल्यास त्याची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न निकाली निघेल.वडगाव मावळ, कामशेत परिसरात विजेचा लंपडाव सतत सुरू असतो. १०० के. व्ही. विद्युत उपकेंद्र तळेगाव दाभाडे येथून २२ के. व्ही. कामशेत फीडर आहे. त्या फीडरवर वडगाव, कामशेत, खांडी, सावळा, कान्हे, टाकवे आदी २० ते २५ गावे येतात. सदर फीडरचे अंतर अंदाजे ४० किलोमीटर आहे. परंतु अनेक गावांत वीजवाहिनी गेल्या मुळे सदर फीडरचे अंतर १०० ते १२० किलोमीटर झाले आहे. सदर वीजवाहिनी रानावनातून, जंगलातून गेली आहे. या वाहिनीजवळ अनेक मोठमोठी झाडे आहेत. अनेकदा झाडांच्या फांद्या वारा किंवा इतर कारणाने वाहिनीवर पडतात. नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित होतो. सदर फीडरवर अनेक गावे व गावांमधील शेती पंप, पीठ गिरण्या आदी असल्यामुळे प्रचंड लोड येतो. त्यामुळेही वाहिनीतील तारा वितळून तुटतात. कामगारसंख्या अपुरी असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करणेस वेळ लागतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे लागते. दुर्गम भागात चार ते पाच दिवस वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. शेती पंप बंद पडतात. विशेषत: पावसाळ्यात ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
वीजपुरवठा कधी होणार सुरळीत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:52 AM