कळकराई हे वस्तीवजा गाव सावळा ग्रामपंचायत हद्दीत आहे. सावळा गावापासून साधारणत: चार ते पाच किलोमीटर दूर असून, येथे जाण्यासाठी रस्ता नाही. या ठिकाणी ४३ कुटुंबे राहतात. या सर्व कुटुंबांना रात्री एकत्र करून त्यांची सभा घेण्यात आली व त्यांना त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. ग्रामस्थांना ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत बांधावयाच्या शौचालय व त्याच्या अनुदानाची माहिती देण्यात आली. कळकराई गावासाठी सुवर्ण जयंती योजनेतून २४ शौचालय मंजूर असून, शौचालय बांधल्यानंतर सदरचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.या वेळी ग्रामस्थांनी बीडीओंकडे सभामंडप बांधून देण्याची मागणी केली. तसेच मोगरज-चौधरीवाडीमार्गे (ता. कर्जत) वनक्षेत्रातून असणाऱ्या पायवाट दुरुस्ती संदर्भात संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. गावात असणाऱ्या पाणीटंचाईसाठी पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे विस्तारीकरण व खोलीकरण करण्याचा प्रस्ताव करण्यात आला. गावात कार्यरत बचत गटांना शासकीय योजनेतून नियमानुसार होणाऱ्या पतपुरवठाचा लाभ घेण्याचे सांगण्यात आले. ३० ते ३२ वर्षांपूर्वी गावातील घरांना आग लागली होती. त्यात घरातील सर्व कागदपत्रे जळून गेली असल्यामुळे त्यांना आता मुलांसाठी जातीचे दाखले काढता येत नसल्याचे बीडीओंना सांगण्यात आले. त्यामुळे कळकराई येथील सर्व कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुले देण्यासाठीच्या प्रस्तावाबाबत माजी सरपंच अर्जुन कावळे व ग्रामसेवक सचिन दुबके यांना मार्गदर्शन केले. या वेळी विस्तार अधिकारी एम. एस. कांबळे, महेंद्र गिरमे, संदीप औटी आदी उपस्थित होते. सावळा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या कळकराई ग्रामस्थांना दळणवळणासाठी रस्ताच नसल्याने विकास पोहोचूच शकलेला नाही.(वार्ताहर) रुग्णांना झोळीतच न्यावे लागते रुग्णालयात या गावच्या परिसरात वनक्षेत्राची हद्द असून, हे गाव रायगड जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली असून, देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असताना, सावळा येथून जाण्यासाठी साडेचार किलोमीटर अंतर कापत डोंगराच्या दरीतून बिकट पायवाटेने मार्ग काढावा लागतो. पावसाळ्यात डोंगराच्या दरडीचे लहान-मोठे दगड कोसळून पायवाट बंद होते. पायवाट पाण्याखाली गेल्याने या गावाचा संपर्क तुटतो. गावात आरोग्य सुविधा पोहोचत नसून, अनेक रुग्ण आजार अंगावर काढत आहेत. गंभीर आजारी रुग्णाला झोळी करून बिकट दरीच्या रस्त्याने न्यावे लागते. अनेकदा रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी कसरत होते. इतर वेळी अंत्यसंस्काराच्या वेळी वणवे लागतात. वीज आली पण असते अनियमित गावात स्वच्छ पिण्याचे पाणी नसून मे महिन्याच्या सुरुवातीला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गावात वीज आली, पण ती नियमित नसते. जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा असून, १३ विद्यार्थी पट आहे. त्यांना शिकवण्यासाठी स्थानिक शिक्षक सूर्यकांत तळपे आहेत. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च व पायपीटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्ध्यावरच सोडले आहे. ग्रामस्थांना रेशन, मतदान, ग्रामपंचायत कार्यालय व तालुक्यात जाण्यासाठी बिकट पायवाटेने ये-जा करावी लागते. पायवाटेच्या दगडावरून पाय घसरून व तोल जाऊन पडल्याने किरकोळ व गंभीर जखमी झाल्याने प्रसंगी मृत्यू ओढवल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामस्थ आपल्या नशिबाला दोष देत आहेत. कधीतरी दळणवळणासाठी रस्ता तयार होईल, या अपेक्षेत गावकरी आहेत.
कळकराईला होणार विकासाचा स्पर्श?
By admin | Published: December 26, 2016 3:03 AM