पिंपरी : राज्यात पोलीस भरती होत असून, त्यात तृतीयपंथींनाही सामावून घ्यावे. त्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेत अर्ज सादर करण्यासाठी रकाना (काॅलम) उपलब्ध करून द्यावा, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी दिला होता. मात्र, याप्रकरणी राज्य सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलीस भरतीसाठी तृतीयपंथींबाबत धोरण केलेले नाही, असे म्हणत सरकारने तृतीयपंथींना पोलीस भरतीमध्ये सामावून घेण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस होण्याचे तृतीयपंथींचे स्वप्न भंगणार का, असा प्रश्न तृतीयपंथींकडून उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी तत्त्वावर नोकरी करून काही तृतीयपंथी सध्या सन्मानाचे जीवन जगत आहेत. यातील काही तृतीयपंथी हे पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र, राज्यात पोलीस दलाच्या भरतीत अर्ज करताना त्यांना तृतीयपंथी म्हणून रकाना (काॅलम) दिला गेलेला नसल्याने त्यांना नोकरीसाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे तृतीयपंथी असलेल्या निकिती मुख्यदल यांनी न्यायालयीन लढा सुरू केला आहे.
निकिता मुख्यदल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत तृतीयपंथींची व्यथा ऐकविली. पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथींना संधी देण्याची मागणी केली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर मुख्यदल यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. तृतीयपंथींसाठी पोलीस भरतीत जागा ठेवा, असे ‘मॅट’ने सांगितले. तरीही भरतीमध्ये तृतीयपंथींसाठी जागा ठेवण्यात आली नाही.
‘राष्ट्रवादी’ही न्यायालयात धाव घेणार
तृतीयपंथींना पोलीस भरतीमध्ये संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून करण्यात आली. पिंपरी येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, कविता खराडे, इम्रान शेख, विनायक रणसुंभे, दत्तात्रय जगताप उपस्थित होते. राज्य सराकरने तृतीयपंथींबाबत योग्य धोरण आखावे. त्यांचे अधिकार त्यांना द्यावेत. जर पोलीस भरतीत तृतीयपंथींना संधी मिळाली नाही तर न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असे अजित गव्हाणे यांनी यावेळी सांगितले.
आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी पोलीस भरतीमध्ये नोकरीची संधी द्यावी
देशात काही तृतीयपंथी सनदी अधिकारी, आयपीएस अधिकारी, पोलीस निरिक्षक, पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातच तृतीयपंथींना असंवेदनशिल वागणूक का? आम्ही काय फक्त रस्त्यावर, सिग्नलला भिक मागायची का? सरकारने आमच्याकडे माणूस म्हणून पहावे. आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी पोलीस भरतीमध्ये नोकरीची संधी द्यावी. - निकिता मुख्यदल, तृतीयपंथी, पिंपरी