Chinchwad Vidhan Sabha: राष्ट्रवादीच्या फुटीने मतांचं गणित बदलणार, काटेंच्या बंडखोरीचा फटका आघाडीला बसणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 04:49 PM2024-11-02T16:49:17+5:302024-11-02T16:51:26+5:30
चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपची मतं सुरक्षित होती, आताही तीच परिस्थिती असल्याने फटका आघाडीला बसण्याची शक्यता
पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडविधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नाना काटेही इच्छुक होते. मात्र त्यांना महायुतीकडून डावलण्यात आलंय. नाना काटेंनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडी की महायुतीला बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांना या पोटनिवडणुकीत १ लाख ३५ हजार ४९४ मतं मिळाली. तर नाना काटे यांना ९९ हजार ४२४ मतं मिळाली. दुसरीकडे राहुल कलाटे यांनी ४० हजार ७५ मत मिळाली होती. त्यावेळी राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे राष्ट्रवादीची मतं विभागली गेली असल्याची प्रतिक्रिया काटेंनी पराभवानंतर दिली. पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी मविआ नेत्यांच्या आग्रहानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तर चित्र वेगळं दिसलं असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. पोटनिवडणुकीत मतांचं गणित पाहता कलाटे यांनी ४० हजार मतं मिळवली आहेत. काटेंनी ९९ हजार मतं मिळवली आहेत. जर कलाटे अपक्ष लढले नसते तर अश्विनी जगताप यांच्या मतांच्या जवळपास काटे नक्कीच पोहोचले असते.
आगामी विधानसभेत त्याउलट चित्र दिसू लागले आहे. राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाना काटेंनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला आहे. पक्ष फुटल्याने दोन्ही मतांचं गणित आता बदलण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीत कलाटे यांच्या बंडखोरीने भाजपाला फायदा झाला होता. आता नाना काटे अजित पवार गट म्हणजेच महायुतीत आहेत. काटेंनी बंडखोरी केल्याने आता महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. परंतु भाजपची मतं त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे. पक्षफुटीने राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता वाढली आहे. भाजपची मतं सध्यातरी सुरक्षित असल्याने आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र
चिंचवड ची जागा महायुतीत भाजप ला गेली आहे. नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. म्हणून भेटायला आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. मी सांगेल तोच निर्णय घ्यावा लागेल अस मी त्यांना सांगितलं आहे - अजित पवार
काटे बंडखोरी कायम ठेवणार
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुती मधील घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी अर्ज कायम ठेवले आहेत. बंडखोरी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले होते. मात्र नाना काटेंनी माघार न घेतल्याचे सांगितले होते. यावरून काटे बंडखोरी कायम ठेवणार असल्याचे सध्यातरी दिसते आहे.