पवनानगर : मावळमधील पवना धरणात बोट उलटून दोन तरुणांचा जीव गेला. याप्रकरणी लेक व्हिव सोसायटीमधील सुमती व्हिलाच्या मालक आरती मंडलीक, बोट मालक संतोष चाळके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा पोलिसांनी कारवाई केली असली तरी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना धरण परिसरात बुधवारी तुषार अहिरे, मयूर भारसाके (दोघे मूळ रा. भुसावळ, जि. जळगाव) हे मित्रांसोबत बुधवारी फिरायला गेले होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ त्यांनी लेक एस्केप व्हिला बंगला भाड्याने घेतला होता. बंगल्याच्या आवारातूनच धरणाच्या पाणलोटात उतरण्यासाठी मार्ग आहे. तिथे पाणलोट क्षेत्रात नाव लावली होती. या नावेतून तुषार, मयूर आणि त्याचे मित्र बुधवारी दुपारी चारच्या सुमारास फिरायला गेले. त्यानंतर मयूर भारसाके ज्या नावेत होता, ती नाव अचानक उलटली. मयूर बुडतोय, हे पाहून दुसऱ्या नावेत असणारा तुषार अहिरे त्याला वाचवायला गेला. दोघांनी पोहत बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस व शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील स्वयंसेवकांनी दोघांना बाहेर काढले. उपचारांपूर्वीच तुषार, मयूर दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेस जबाबदार सुमती व्हिलाचे मालक आहेत, अशी तक्रार मृतांच्या नातेवाईकांनी केली होती, त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
तपासात या गोष्टी आल्या पुढे
१) दुधीवरेचे येथील व्हिलाचे मालक आरती मंडलीक या आहेत. पवना धराणाचे पाण्यात उतरण्यास मनाई आहे. मात्र, त्यांनी व्हिलामधुन धराणाच्या बॅक वॉटरमध्ये उतरण्यासाठी रस्ता ठेवला. तसेच ठिकाणी पाण्यात उतरण्यास बंदी आहे किंवा पाण्यात उतरू नये, अशा आशायांचे सुचनांचे फलक लावले नाहीत. कोणीही पाण्यात उतरणार नाही, याची काळजी घेण्यासाठी गार्ड नियुक्त केला नाही. २) व्हीला मालकाच्या निष्काळजीपणा तसेच पवना धरणाचे पाण्यात बोट चालवण्यास किंवा नेण्यास मनाई असताना नादुरुस्त अवस्थेतील बोटी (होडी) उघडयावर ठेवल्या. खबरदारी न घेता किंवा साखळदंडाने बांधल्या नाहीत, म्हणून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.