पिंपरी : राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत केंद्रशासित प्रदेश दमण येथून भोसरीत आणलेला अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीतून आणलेले मद्याचे १२२ बॉक्स भोसरी, फुलेनगर येथे जप्त करण्यात आले. १७ लाख ३३ हजारांचा हा माल आहे. या प्रकरणी दिलीप रतनलाल जयस्वाल (रा. भोसरी) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुुसार, भोसरी येथे एमएच १२ पी १३२५ या क्रमांकाची मोटार अवैध मद्य वाहतूक करत असल्याची खबर राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून ही मोटार अडवली. मोटारचालकाकडे चौकशी केली असता, मोटारीतील मद्यसाठा एका साडीच्या दुकानात ठेवण्यासाठी दिला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे साडीच्या दुकानाचे मालक दिलीप याच्याकडे चौकशी केली असता, भोसरी येथील दुकानात मद्यसाठा असल्याचे त्याने सांगितले. उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानात जाऊन मद्याचे बॉक्स जप्त केले आहेत. (प्रतिनिधी)
दमणहून आणलेला मद्यसाठा जप्त
By admin | Published: January 05, 2017 3:14 AM