- विश्वास मोरे पिंपरी : शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत आहे. मात्र, नद्यांच्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. इंद्रायणी नदीत रसायन मिश्रित पाणी सोडत असल्याने नदी फेसाळली आहे, याबाबतचे वृत्त महिन्यापूर्वी प्रसिद्ध केले. मात्र, आता त्यापाठोपाठ शहराला पाणीपुरवठा करणारी पवनामाईही फेसाळली आहे. याकडे महापालिका प्रशासन, पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील एकूण लांबी २४.३४ किलोमीटर तसेच इंद्रायणी नदीची एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे. तर मुळा नदी शहराच्या सीमेवरून १० किलोमीटर अंतराची आहे. तळवडेपासून तर चन्होलीपर्यंत इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढले आहे. तसेच किवळेपासून तर दापोडीपर्यंत पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे.
किवळेपासून तर दापोडीपर्यंत पवना नदीचे पात्र आहे. यामध्ये शहर परिसरात नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवड गाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. कासारवाडी स्मशानभूमीपासून पुढे पिंपळेगुरव पासून सांगवी, पिंपळे निलख, कासारवाडी, दापोडी नदीच्या दोन्ही बाजूला भराव टाकला आहे. त्यामुळे नदीही अरुंद होत आहे.
पवना नदी फेसाळलेले पाणी आहे. याबाबत तक्रार आली होती. मात्र, बंधायाच्या तिथे कपडे धुण्याचे काम करतात. डिटर्जंट मिळले जात असल्याने ते पाणी फेसाळले होते. मात्र, पुढे हे पाणी फेसाळलेले नव्हते. याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण.
पवना नदी उगम ते संगम असा नदीसुधार कार्यक्रम राबवायला हवा. नदीतील पाणी फेसाळलेले असेल तर धोक्याची घंटा आहे. कोठेतरी केमिकल मिश्रित पाणी सोडले जात असावे, याबाबत महापालिकेने कारवाई करावी.
- राजीव भावसार, पर्यावरण
पवना नदीतील पाणी फेसाळले आहे. याबाबतची माहिती महापालिका पर्यावरण विभागास दिली होती. नदी कोणी रसायन मिश्रित पाप सोडत असेल तर त्यावर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच पाणी कशाने फेसाळले याची चौकशीही करावी.
- अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेविका