पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभाग देखील ‘ॲक्शन मोड’वर आहे. अवैध दारू धंद्यांवर १६ एप्रिल ते २२ मार्च या सव्वामहिन्याच्या कालावधीत मोठी कारवाई करत ४४१ गुन्हे दाखल केले. तसेच ३२५ संशयितांना अटक केली. यात ५३ वाहनांसह एक कोटी ५३ लाख आठ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे अवैध दारु धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे.
पुणे जिल्ह्यात शिरुर, मावळ, बारामती आणि पुणे शहर असे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून एक्साइजने अवैध दारू धंद्यावाल्यांना दणका दिला आहे. निवडणूक काळात अवैध दारू वाहतूक, साठा तसेच विक्री व निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक्साइजकडून खबरदारी घेत रात्र गस्त वाढवण्यात आली आहे. त्यासाठी १४ नियमित व तीन विशेष भरारी पथके नियुक्त केली आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, संशयित वाहनांची तपासणी केली जाते आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्यसाठ्यावर छापे मारण्यात येत आहेत.
चौघांकडून घेतले बंधपत्र
महारष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईतांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले. आचार संहिता लागल्यापासून १३ मार्च ते २२ एप्रिल या कालावधीत असे चार सराईतांकडून बंधपत्र घेण्यात आले. यात बंधपत्राची एक लाख पाच हजार रुपयांची रक्कम आकारण्यात आली.
तीन परवाने निलंबित
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवानाधारक मद्यविक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. यात बिअर/वाईन शाॅपी व परवानाधारक मद्य विक्रेत्यांचे तीन परवाने रद्द करण्यात आले. तसेच नियमभंग प्रकरणी ७७ अनुज्ञप्तीधारकांवर कारवाया केल्या.
आचरसंहिता लागल्यापासून अवैध दारू धंद्याप्रकरणी दाखल गुन्हेगुन्हे - ४४१अटक संशयित - ३२५जप्त वाहने - ५३जप्त मुद्देमाल - १,५३,०८,८०५
कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर एक्साइजच्या पथकांचा वाॅच आहे. असे प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी माहिती द्यावी. संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल.
- चरणसिंग राजपूत, अधीक्षक, एक्साइज, पुणे