पिंपरी : पिंपरी-चिंचवड म्ाहापालिकेच्या निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसेच्या नेत्यांनी केला. सर्वाधिक बंडखोरी असणाºया भाजपा आणि राष्टÑवादीच्या नेत्यांनी बंडखोरांशी संवाद साधून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले.
महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. ३२ प्रभाग आणि १२८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी झाली. अनेक उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आले. त्यामुळे काही निवडणूक कार्यालयांमधील छाननी प्रक्रिया रविवारी पहाटेपर्यंत सुरू राहिली. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीस सोमवारपासून सुरूवात झाली. दरम्यान, महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात अर्ज भरून बंडखोरी केलेल्यांची, अपक्षांची समजूत काढण्याचे प्रयत्न सोमवारी दिवसभर काही इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येत होते. त्यामुळे पहिल्या दिशवी ५९ जणांनी माघार घेतली.
उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आज दुपारी तीनपर्यंत होती. त्यामुळे शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात उमेदवारी माघारी घेण्यासाठी गर्दी झाली होती. तीन वाजता कार्यालयांतील प्रवेश बंद करण्यात आला. त्यानंतर कार्यवाही सायंकाळी पाच पर्यंत सुरू होती.
नेत्यांचा बंडखोरी रोखण्यात कस
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच बंडोबांना थंड करण्याची मोहीम काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे आदी प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी अवलंबिली होती. राष्टÑवादीतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या उमेदवारांशी संवाद साधून चर्चा केली तर भारतीय जनता पक्षांत अधिक अस्वस्थता असल्याने जुन्या फळीतील नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी संवाद साधला. तर शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहरप्रमुख राहूल कलाटे यांनी बंडखोर कार्यकर्त्यांशी संवाद साधून मनधरणी केली. तसेच काँग्रेसच्या वतीनेही शहराध्यक्ष सचिन साठे यांनी बंडखोरी होऊ नये यासाठी दक्षता घेतली. बंडोबांना थंड करण्याची मोहीम दुपारपर्यंत सुरू होती.