पिंपरी : सरकारी नोकरी असलेला पती व दोन मुलगे असलेली महिला इंजिनिअरच्या प्रेमात पडली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्याच्यासोबत 'घरोबा' करण्यासाठी तिने पतीला घटस्फोट दिला. त्यासाठी पती आणि तिच्या वयामध्ये १५ वर्षांचे अंतर असल्याचे कारण तिने सांगितले. मात्र, त्यानंतर इंजीनिअरने लग्नास नकार दिला. बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी इंजिनियरला अटक केली.
याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने रविवारी (दि. १०) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कुणाल शिवाजी निकम (वय २७, रा. नवीन घरकुल, चिखली), असे अटक केलेल्या इंजिनीयरचे नाव आहे. हा प्रकार जुलै २०१९ ते १६ मार्च २०२२ या कालावधीत फिर्यादी महिलेच्या घरी व दिघी येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल निकम हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून तो नोकरी करतो. कामाच्या ठिकाणी त्याची फिर्यादी महिलेसोबत ओळख झाली. फिर्यादी महिलेचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे.
तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू तुझ्या पतीपासून घटस्फोट घे, मी तुझ्या सोबत लग्न करतो व तुला सांभाळतो, तुला सुखात ठेवतो, अशी खोटी आश्वासने देऊन आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली. तसेच फिर्यादीच्या राहत्या घरी व दिघी येथे फिर्यादीसोबत जबरदस्तीने वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले.
फिर्यादी महिलेच्या आणि तिच्या पतीच्या वयामध्ये १५ वर्षांचे अंतर आहे. पती आपल्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे, असे कारण सांगून फिर्यादी महिलेने घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुलगे आहेत. इंजिनीअर कुणाल निकम याने लग्नाचे आमिष दाखवल्याने फिर्यादी महिलेने तिच्या पतीसोबत 'काडीमोड' घेतला. त्यानंतर इंजिनीयर कुणाल निकम याने लग्नास नकार दिला. त्यामुळे फिर्यादी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी कुणाल निकम याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर तपास करीत आहेत.