पिंपरी : केक डिलिव्हरीबाबतच्या वेब पेजवरील मोबाईल क्रमांकावर फोन करून महिलेने केकची ऑर्डर दिली. त्यानंतर केकच्या ऑनलाइन पेमेंटसाठी व्हाट्सअपद्वारे पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन केला असता अज्ञात व्यक्तीने महिलेच्या खात्यातून एक लाख ६७ हजार २३० रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. ही घटना ४ मार्च २०२२ रोजी मोशी येथे घडली.
याप्रकरणी महिलेने सोमवारी (दि. १) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केकस एन मोअर - ऑन केक डिलिव्हरी इन पुणे या वेब पेजवरील मोबाईल क्रमांकावर फिर्यादीने फोन करून केकची ऑर्डर दिली. त्यानंतर त्या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीला फोन केला. केकचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी फिर्यादीस व्हाट्सअप द्वारे क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितला. फिर्यादीने क्यूआर कोड स्कॅन केला असता अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या बँक खात्यातून एक लाख ६८ हजार २३० रुपये ट्रान्सफर करून फिर्यादीची फसवणूक केली.