पिंपरी : टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १) सकाळी साडेसहा वाजता वडमुखवाडी येथे घडली. सिंधू चंद्रकांत पाटील असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुमन धनाजी मोहिते (वय ५२, रा. वडमुखवाडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक उमेश लक्ष्मण गायकवाड (वय १९, रा. वडमुखवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन मोहिते आणि त्यांची मैत्रीण सिंधू पाटील या दोघी वडमुखवाडीमधील लक्ष्मीनारायणनगर कॉलनीमधून पायी चालत जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने सिंधू यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने सिंधू यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टेम्पोचालक उमेश हा पळून गेला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दारू पिण्यास नकार दिल्याने तरुणावर तलवारीने वार
दारू पिण्यासाठी नकार दिल्याने तरुणावर तलवारीने वार केले. ही घटना बुधवारी (दि. १) पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुळवे वस्ती भोसरी येथे घडली. अनुज फेबियन केअे (वय २८, रा. दापोडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवप्रीत अजित सिंग (२९, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी नवप्रीत याचे गुळवे वस्ती भोसरी येथे वर्कशॉप आहे. वर्कशॉपमध्ये नवप्रीत हा दारू पीत असताना त्याने अनुज यांना दारू पिण्याचा आग्रह केला. त्यासाठी अनुज यांनी नकार दिला असता नवप्रीत याने अनुज यांच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये अनुज गंभीर जखमी झाले आहेत.