पिंपरी : घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे ३५ महागडे मोबाईल जप्त केले. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. कन्हैयालाल चेलाराम नटमारवाडी (२०, रा. वडगाव मावळ पुणे. मूळ रा. गुजरात) आणि त्याच्या साथीदार महिलेला देखील पोलिसांनी अटक केली.
पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात होणाऱ्या चोरीच्या अनुषंगाने वाकड पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत होते. त्यामध्ये एक महिला आणि तिचा साथीदार चोरी करताना पोलिसांना आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी ताथवडे परिसरातून कन्हैयालाल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन मोबाईल फोन आढळले. त्याच्या साथीदार महिलेचा शोध घेऊन तिलाही ताब्यात घेतले. तिच्याकडेही सुरुवातीला दोन मोबाईल फोन आढळले.
सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, पोलिस अंमलदार संदीप गवारी, स्वप्नील खेतले, दीपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, रमेश खेडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
सहा गुन्ह्यांची उकल -
दोघांकडे तपास करत वाकड पोलिसांनी १७ लाख रुपये किमतीचे ३५ महागडे मोबाईल जप्त केले. दोघांनी चिंचवड, निगडी, खडक, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल फोन चोरी केल्याचे सांगितले. यामध्ये सहा गुन्ह्यांची उकल झाली. अन्य मोबाईलबाबत वाकड पोलिस तपास करीत आहेत.