पिंपरी : रस्त्याचे काम चालू असल्याने दुचाकी घसरली. त्यामुळे दुचाकीचालक व त्याच्या मागे बसलेली दुचाकीस्वार महिला हे दोघेही खाली पडले. त्याचवेळी चारचाकी वाहन महिलेच्या डोक्यावरून गेले. यात महिलेचा मृत्यू झाला. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ शनिवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहाच्या हा अपघात झाला.
सरस्वती सुरेश शिंदे (वय ५६, रा. राजगड पार्क, मोरेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा गणेश सुरेश शिंदे (वय ३७) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश व त्यांची आई सरस्वती शिंदे एका आजारी नातेवाईकाची भेट घेण्यासाठी दुचाकीवरून प्राधिकरणात जात होते. आकुर्डी येथे रस्त्याचे काम सुरू असून तेथे शिंदे यांची दुचाकी घसरली. यात दुचाकी चालविणारे गणेश आणि त्यांच्या आई सरस्वती दुचाकीवरून खाली पडले. या वेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेले चारचाकी वाहन सरस्वती यांच्या डोक्यावरून गेले. या अपघातात जखमी झालेल्या सरस्वती यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सरस्वती यांना डॉक्टरांकडून मयत घोषित करण्यात आले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.