पिंपरी : जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करत सुवासिनींकडून वटवृक्षाचे पूजन केले जाते. मात्र कर्तव्य देखील तितकेच महत्त्वाचे असल्याने महिलापोलिसांनी ड्युटी असतानाच वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या रोपांचे वाटप करून तसेच रोपण करून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संकल्पही केला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत मोठ्या संख्येने तरुण पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. सण-उत्सव असतानाही या महिला पोलिसांकडून कर्तव्याला प्राधान्य दिले जाते. दररोज बारा तास ड्युटी करून कुटुंब सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागते. अशाच पद्धतीने वटपौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. २४) ऑनड्युटी असलेल्या महिला पोलिसांनी पोलीस ठाणे तसेच चौकीतच वडाचे पूजन केले. वाल्हेकरवाडी चौकीत नऊ महिला पोलिसांनी गणवेशात पूजन केले. सांगवी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक कविता रुपनर यांच्यासह आठ महिला कर्मचारी यांनी साई चौक येथे वड पूजन केले.
महिला पोलिसांना सण-उत्सव साजरे करण्यासाठी सुट्टी मिळतेच असे नाही. त्यामुळे शक्य होईल तसा याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला जातो, असे महिला पोलीस कर्मचारी यांनी सांगितले.
लग्नानंतर पहिल्याच वटपौर्णिमेला ऑनड्युटी असल्याने नियमित कामकाज करून वडाच्या रोपांची लागवड केली. दरवर्षी वटपौर्णिमेला वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. - प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग