पिंपरी: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर महिलांनी मासिक पाळीच्या पाच दिवस आधी नंतर लस घेऊ नये असा संदेश फिरत आहे. त्यामुळे या विषयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे महिलांनी लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी महापालिका वैद्यकीय विभागाने व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ मध्ये महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी सांगीतले की, महिलांनी मासिक पाळी दरम्यान कोरोना प्रतिबंध लस घेवू नये असा कोणताही दावा लस बनविण्याऱ्या कंपन्यांनी केलेला नाही. लसी बाबत कोणतीही माहिती हवी असल्यास महापालिका रुग्णालय, दवाखान्यातीळ डॉक्टरांशी संपर्क करून माहिती घ्यावी. तसेच स्त्री रोग तज्ज्ञ किंवा आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संवाद साधून सल्ल्या घ्यावा. गर्भवती आणि स्तनदा माता यांना कोरोना प्रतिबंध लस द्यावी की नाही या बाबत पुरेसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे त्यांना सध्या लस दिली जात नाही. परंतु इतर महिलांनी लस घ्यावी.
लस घेतल्यामुळे शरीरात कोरोना विषाणू विरुध्द लढण्यास प्रतिकारशक्ती तयार होते. लस घेतल्यावर कोरोनाचा संसर्ग झाला तरी रुग्ण गंभीर होत नाही. त्यामुळे लस घेणे आवश्यक आहे. लस घेतल्याने कोणताही धोका नाही.
मासिक पाळीच्या काळात महिलांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे लस घेतल्याचा फायदा होणार नाही. असे सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशात सांगितले जात आहे. परंतु यावर विश्वास न ठेवता योग्य डॉक्टरांकडून योग्य माहिती घ्यावी. सुरुवातीला आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. फ्रँन्ट लाईन वेकर्स याना लस देण्यात आली आहे. सध्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस देणे सुरू आहे. तसेच केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार १८ वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.