पिंपरी : दुकान सुरू करण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. पैसे न आणल्यास तलवारीने कापून टाकीन, आमदार व खासदार आमच्या ओळखीचे असून, आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही, अशी विवाहितेला धमकी दिल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित राजेंद्र कोठावदे (वय ३०), राजेंद्र गंगाधर कोठावदे (वय ५८), लता राजेंद्र कोठावदे (वय ५५), पूनम राजेंद्र कोठावदे (वय २९, सर्व रा. पुण्याई बंगला, योग विद्याधामजवळ, एचपीटी कॉलेज रोड, लेन नं. ३, नाशिक) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता सासरी नांदत असताना तिला काही एक माहिती नाही, वडिलांनी कोणतेही काम शिकविले नाही यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास देत हाताने मारहाण केली.दुकान सुरू करण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणावेत. ते न आणल्यास तलवारीने कापून टाकीन, अशी धमकी दिली. यासह ‘आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही, आमदार व खासदार आमचे ओळखीचे आहेत’ अशीही धमकी देत विवाहितेला शिवीगाळ केली. विवाहितेच्या वडिलांनी विवाहामध्ये दिलेली सोनसाखळी, सोन्याची अंगठी, नथ हे दागिने आरोपींनी काढून घेतले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.