देहूरोड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या येथील ऐतिहासिक धम्मभूमीवरील बुद्धविहाराचे बांधकाम विनाविलंब सुरू करावे, या आणि इतर मागण्यांसाठी धम्मभूमी संवर्धन महिला आघाडी संघाच्या वतीने गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली.महिलांनी बुद्धविहारात धम्मवंदना घेतल्यानंतर ऐतिहासिक धम्मभूमीचा विकास झालाच पाहिजे अशा घोषणा देत उपोषणाला सुरुवात केली. उपोषणास देहूरोड परिसरासह मावळ, मुळशीसह विविध भागातील महिलांनी सहभाग घेतला आहे. मंदाकिनी भोसले, राजश्री जाधव, शिल्पा शेंडे, अरुणा रणदिवे, अंजना गायकवाड, श्यामा जाधव, अनिता जाधव, प्रतिमा चंदनशिवे, रंजना कांबळे, पुष्पा सोनवणे, कासुबाई शिंदे, माया तुळवे आदी प्रमुख महिलांसह भन्ते बुद्ध घोष व धम्म बोधी यांचा सहभाग आहे. मंदाकिनी भोसले व राजश्री जाधव यांनी उपोषणाची भूमिका स्पष्ट केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेण्यापूर्वी दोन वर्षे अगोदर २५ डिसेंबर १९५४ ला स्वहस्ते येथील विहारात बुद्धमूर्ती बसविली आहे. मात्र, गेल्या ६३ वर्षांत या ऐतिहासिक बुद्धविहाराचा विकास झाला नाही. संबंधितांनी विकासकामे सुरू करावीत, अन्यथा बांधकामाची संपूर्ण जबाबदारी महिलांकडे सोपवावी. येथील दोन्ही ट्रस्टमधील वाद मिटत नसतील, तर दोन्ही न्यासांची नोंदणी रद्द करून शासनाने प्रशासक नेमून बुद्धविहार ढासळण्यापूर्वी बांधकामास सुरुवात करावी. विकासकामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, बुद्धविहाराचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने योग्य ते पाऊल उचलावे अशी मागणी केली असून, संबंधितांनी बांधकाम कधी सुरू होणार याबाबत सर्व १८ विश्वस्तांच्या सहीचे पत्र द्यावे, असे भोसले व जाधव यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
धम्मभूमी विकासासाठी महिलांचे उपोषण
By admin | Published: December 23, 2016 12:45 AM