रहाटणी : रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, शीतल काटे, अनिता संदीप काटे, कैलास कुंजीर यांनी रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात प्रचार फेरी काढली. फेरीत महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती. सर्व उमेदवारांनी प्रभागातील सोसायटी परिसरात नागरिकांशी संवाद साधला. यासाठी महिला व युवतींनी स्वत: पुढाकार घेतला. मतदारांशी संवाद साधताना नाना काटे म्हणाले, प्रभागातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून दक्षतेच्या उपाययोजना केल्या जातात. रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात कायदा व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पिंपळे सौदागरला स्वतंत्र पोलीस चौकी सुरु केलेली आहे. प्रभागात अंतर्गत रस्त्यांवर पीएमपीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढविणे. विद्यालयांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविणे व मुख्य चौक व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, महिलांसाठी आवश्यक तेथे स्वच्छतागृहाची उभारणी केली जाणार आहे. निवडणुकीत प्रभागाचे नेतृत्व करण्यासाठी दोन महिला उमेदवार विद्यमान नगरसेविका शीतल काटे व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनिता संदीप काटे निवडणूक रिंगणात आहेत. प्रभागातील महिलांच्या वैयक्तिक अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना तत्परतेने मदत देण्यासाठी स्वतंत्र महिला जनसंपर्क कार्यालय उभारणार असल्याचे काटे यांनी सांगितले. (वार्ताहर)
राष्ट्रवादीसाठी महिलांचा पुढाकार
By admin | Published: February 14, 2017 2:04 AM