लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : लोकमत सखी मंच आणि कै. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अशा या दोघी’ नाटकास सखींचा उदंड प्रतिसाद मिळाला. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित हे नाटक पाहण्यासाठी सखींनी मोठी गर्दी केली होती. खचाखच भरलेले प्रेक्षागृह या दोन अंकी नाटकात स्त्रियांचे भावविश्व उलगडण्यात आले. माधव (सुजीत देशपांडे) आणि माया (ऋचा श्रीखंडे) हे तरूण जोडपे यांच्याभोवती नाटकाची कथा आहे. माधव मध्यमवर्गीय क़ुटूंबातील, साध्या विचारांचा तर माया श्रीमंत घरात वाढलेली उच्च विचार करणारी अशी विसंगत परिस्थिती असताना, माधव वेळोवेळी तडजोडी कशा करतो.माया आणि माधव या दोघांच्या विचारात मोठी तफावत तरिही माधव आयुष्य आनंदित करण्याचा कसा प्रयत्न करतो. कोणत्याही परिस्थितीत, तडजोड स्विकारून परिस्थितीवर मात करणे हाच गुण हेरुन मायाने माधवशी लग्न केलेले असते.दोन टोकाच्या परिस्थितीतील व्यकती एकत्र येतात. त्यांच्यात छोट्या मोठ्या गोष्टींवरून उद्भवणारा वाद कसा असतो. वैचारिक मदभेदामुळे कौटुंबिक स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो. ऐकमकांमध्ये क्षुल्लक कारणावरून कसा दुरावा निर्माण होतो. त्यातील कलह, वैचारिक मतभेद यातून प्रेक्षकांनाही धडा घेण्यासारखे बरेच काही मिळाले. नाटकातील दुसरे जोडपे म्हणजे विश्वनाथ (निखिल केंजळे) आणि प्रतिभा (किरण नागपुरे) होय. या जोडप्याच्या माध्यमातून नाटकात महिलेला घरात कशी वागणूक दिली जाते. एक महिला ही माणूस नसून केवळ उपभोगाची वस्तू आहे, अशा पद्धतीने तिला दिली जणारी वागणूक याचे वास्तव या नाट्यप्रयोगात एका जोडप्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे मांडले आहे. स्त्रीला सन्मानाची वागणूक दिली जात नाही. समाजव्यवस्थेत अद्यापही स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते. हे नाटकातील दृश्य पाहून प्रेक्षकांचे मन सुन्न होते. विश्वनाथकडून प्रतिभाला पत्नी म्हणुन वागणूक कशी मिळाली. हे पाहत असताना,नाटकातील आणखी दोन पात्र माधवचा मित्र वसंता आणि मायाचा बॉस या दोन व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. स्त्री पुरूषांमधील वैचारिक मतभेद किती टोकाला गेले तरी हे नाजूक नाते कसे जपावे, याविषयी या व्यक्तिरेखा बरेच काही सांगून जातात नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर आणि प्रशांत गिरमकर हे दिग्दर्शक आहेत. लेखक गवाणकर यांनी समजातील वास्वव आपल्या लेखणीतून नाट्यरूपात उतरिवले आहे. तर दिग्दर्शक गिरमकर यांनी हे वास्तव रंगमचांवर यशस्वीपणे उतरविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयाचे दर्शन घडविले आहे. कार्यक्रमास पुष्पा गव्हाणे, गीतल गोलांडे उपस्थित होत्या.लोकमतने सखी मंचच्या माध्यमातून एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महिलाप्रधान नाटक म्हणून ‘अशा या दोघी’ या नाटकाची निवड केली. नाटक हे असे एक माध्यम आहे, त्यातून मनोरंजनच नव्हे तर प्रबोधनाचे ते एक साधन आहे. अशा या दोघी या नाटकात महिलांच्या दोन टोकांच्या विचारसरणी कशा असतात, याचे सादरीकरण अत्यंत उत्तम पद्धतीने करण्यात आले आहे.- भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
नाट्यातून उलगडले महिलांचे भावविश्व
By admin | Published: July 03, 2017 3:00 AM