पिंपरी : महाराष्ट्र शूटिंग चॅम्पियनशिप २०२२ ही ३७ वी स्पर्धा ५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत वरळी मुंबई येथे झाली. यात पिंपरी-चिंचवड पोलीस दलास कांस्य पदक मिळाले. आयुक्तालयातील पोलीस नाईक रश्मी स्वप्नील धावडे यांनी ५० मीटर (०.२२ बोर) फ्री पिस्टल प्रकारात कांस्य पदक मिळविले.
महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या माध्यमातून पोलिसांसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. राज्यभरातील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस नाईक रश्मी धावडे यांनी सहभाग घेतला. रश्मी धावडे या शहर पोलिसांच्या विशेष शाखेत चार वर्षांपासून कार्यरत आहेत. २००७ मध्ये पोलीस दलात त्या रुजू झाल्या आहेत. बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात त्यांचे विशेष प्राविण्य आहे. स्पोर्ट्स कोटामधूनच त्यांची पोलीस दलात निवड झाली आहे. २०२० मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेल्या शूटिंग स्पर्धेत रश्मी धावडे यांनी १० मीटर एअर पिस्टल या प्रकारात सांघिक कांस्य पदक मिळविले.
रश्मी धावडे यांनी पिस्तूल नेमबाजीमध्ये २००९ पासून पोलीस संघाकडून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गन फॉर ग्लोरी प्री नॅशनल या राष्ट्रीय स्तरावरील २०१५ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक मिळवले. २०१२ मध्ये गरोदर असताना रश्मी यांनी पंजाबमधील जालंधर येथे झालेल्या ऑल इंडिया पोलीस शुटिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेत सहभाग घेत चमकदार कामगिरी केली होती. बालेवाडी येथे २०१९ मध्ये ऑल इंडिया पोलीस शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सांघिक गटातून कांस्य पदक पटकावले. तसेच वैयक्तिक गटातून चौथा क्रमांक मिळवला होता.
कोरोनावर मात, शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सराव
रश्मी यांचे पती स्वप्नील धावडे हे बॉक्सर असून, संरक्षणदलातून निवृत्त झाले आहेत. गेल्या वर्षी जुलै व ऑगस्टमध्ये रश्मी यांना कोराना विषाणूंचा संसर्ग झाल्याने सव्वा महिना रुग्णालयात दाखल होत्या. दरम्यान गर्भाशयाची शस्त्रक्रियाही झाली. या आजारपणामुळे आता खेळता येणार नाही, अशी रश्मी यांची मानसिकता झाली होती. मात्र पती स्वप्नील यांनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यामुळे रश्मी यांनी स्वत:ला सावरत पुन्हा सराव सुरू केला.