पिंपरी - कॅप एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथे प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या संवाद शब्दांचा शब्दांशी या कार्यक्रम झाला. ‘सृष्टीतील फुले कोमेजतात, शब्द कोमेजत नाहीत. शब्द आपली जन्मभर सोबत करतात. शब्द जितका महत्वाचा तितका तितकाच त्याचा वापरही महत्वाचा असतो. शब्दाचा वापर योग्य झाला तर ठिक अन्यथा चुकीचा वापर झाल्यास अडचणी वाढू शकतात, असे मत शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले. कॅप एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथे प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या संवाद शब्दांचा शब्दांशी या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी शब्दांगण वसईच्या अध्यक्षा शिल्पा परुळेकर, प्राचार्या शुभांगी इथापे, उपप्राचार्या छाया लोळे, पर्यवेक्षिका निशा देशमुख, लेखिका डॉ. वसुधा वैद्य, कवि व गीतकार संजय पाटील, विलास चाचे, कथालेखिका संध्या सोंडे कवयित्री अपर्णा बन्नगरे, वैशाली भालेकर, शानुदा पंडीत आदी उपस्थित होते. शिल्पा परुळेकर म्हणाल्या, ‘‘वाचनाने मनुष्य घडतो. कमी शब्दांत व्यक्त व्हायचे असेल तर कवितेसारखे दुसरे साधन नाही.या उपक्रमातून दहा हात जरी लिहिते झाले तरी हा कार्यक्रम सफल झाला असे म्हणता येईल.’’वसुधा वैद्य यांनी कवितेचे नवरसाचे महत्व सांगत रसग्रहण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. कवितेत दडलेल्या भावाशी एकरूप झाले तरच कवितेचा रसास्वाद घेता येतो. संध्या सोंडे म्हणाल्या, साहित्यामध्ये समाजमनाचे प्रतिबिंब दडलेले असते. कथा, कविता, नाटक वाचल्याने सामाजिक जाणीवा विकसित होतात.’’ विलास चाचे व अपर्णा बन्नगरे यांनी साहित्यातील शब्दांचे खेळ घेत,अनेक प्रश्न विचारुन मुलांना बोलते करत पाठ्यपुस्तकातील व अवांतर वाचनाची उजळणी घेतली. अचूक उत्तरे सांगतील त्यांना बक्षीसे दिली. कवि संजय पाटील यांनी लोकगीते सादर करीत कविता सुरात वाचली. ती अधिक चांगली लक्षात राहते, असे सांगितले. वैशाली भालेकर, शानुदा पंडीत, साधना सपाटे, हेरंब पायगुडे यांनीही रचना सादर केल्या. मुलांनी कथा, कविता, गाणी यांचा भरपूर आनंद घेतला. प्राचार्या इथापे म्हणाल्या,‘‘मुलांच्या मनात साहित्याची गोडी निर्माण होण्यासाठी हा उपक्रम होता.’’संजय कु-हाडे यांनी सूत्रसंचालन, साधना सपाटे यांनी आभार मानले. माधव भुस्कुटे, किरण बेंद्रे, राजेंद्र खेडकर,अमित पंडित यांनी विशेष परीश्रम घेतले.
संवाद शब्दांचा शब्दांशी, प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाला कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 4:39 PM