बारामती : बारामती-फलटण-शिरवळ या मार्गाचे रखडलेले काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. विशेषत: बारामती तालुक्यातील सांगवी ते बारामती शहरापर्यंत काम भूसंपादनाचा मोबदला न दिल्यामुळे तसेच, रीतसर भूसंपादन न केल्यामुळे रखडले होते. आता सांगवी, शिरवली, खांडज या गावांतील शेतकऱ्यांच्या भूसंपादनासाठी ३० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे भूसंपादनाचा प्रश्न सुटणार आहे. मागील ६ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत हा रस्ता आहे. यापूर्वी ‘बीओटी’ तत्त्वावर रस्ता बांधण्यात येणार होता, आता त्यामध्ये बदल करून राष्ट्रीय सडक महामार्ग योजनेतून काम होणार असल्याचे सांगण्यात आले.रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा ‘लोकमत’ने सातत्याने केला. या रस्त्याचा खर्चदेखील वाढला. ७८ किलोमीटर लांबीचा रस्ता पुणे विभागाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने आयव्हीआरसीएफ कंपनीला काम दिले होते.शिरवळ मार्गे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला हा मार्ग जोडला आहे. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न सुटेल. परंतु, बारामती तालुक्यात या रस्त्याचे काम करत असताना भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. रस्ता अर्धवट अवस्थेत पडला. तत्पूर्वी वाहतूक व्यवस्था होण्यासाठी केलेले रस्ते देखील उखडले आहेत. त्यामुळे बारामती ते फलटणपर्यंत वाहनचालकांना कसरतच करावी लागते. आता तालुक्यातील भूसंपादनाचा मोबदला मिळणार असल्यामुळे रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासनाकडून भूसंपादनासाठी ३० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. त्याची रीतसर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळणार आहे. शासनाच्या नव्या भूसंपादन धोरणानुसार हा मोबदला मिळणार आहे. या रस्त्याचे काम रखडल्यामुळे अनेकांचे बळी गेले. तसेच, अनेक जण जखमी होऊन जायबंदी झाले. त्यामुळे हा रस्ता मार्गी लावणेदेखील तितकेच गरजेचे होते. ७८ किलोमीटर पैकी ४८ किलोमीटरचे काम झाले आहे. भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी माजी उपमुख्यमंत्री यांनी अजित पवार यांनी प्रयत्न केला. त्यामुळे आता बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळणार आहे. (प्रतिनिधी)
बारामती-फलटण-शिरवळ रस्त्याचे काम मार्गी
By admin | Published: October 15, 2016 5:47 AM