देहूरोड : मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल व एलिव्हेटेड रस्त्याच्या कामाची मुदत संपली असताना कामे अर्धवट असून, लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाच्या डिझाईनला रेल्वे विभागाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला नसल्याने पुलाचे काम रखडले आहे.संबंधितांकडून मंजुरी मिळाल्यानंतर बांधकामास चार महिने लागणार आहेत. दरम्यान, देहूरोड येथील पुलाच्या एलिव्हेटेड संपूर्ण रस्त्याचे काम येत्या सप्टेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले असून, एलिव्हेटेड रस्त्याने वाहने थेट शहराबाहेर जाणार असल्याने देहूरोडच्या दोन्ही मुख्य चौकांसह बाजारपेठ भागातील वाहतूककोंडी सुटणार आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल व बाजारपेठ भागातून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत एक किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रस्ता करण्यात येत आहे. या कामासाठी ४३ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. डिसेंबर २०१६ महिन्यात कंत्राटदारास कामाचा आदेश दिल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने देहूरोड येथील एक किलोमीटरचा एलिव्हेटेड रस्ता व लोहमार्गावरील उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक कामे वेगात सुरू असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही एलिव्हेटेड रस्त्याचे काम अर्धवट असल्याचे दिसत आहे. उड्डाणपुलाच्या भराव बांधकाम झाले आहे. मात्र मुख्य उड्डाणपूल बांधकामास सुरुवात करण्यात आलेली नाही. सुरुवातीला एलिव्हेटेड रस्ता बांधकामापैकी साठ टक्के काम एका वर्षात पूर्ण झाले होते. त्या वेळी मार्चअखेर संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र संबंधित कामे अद्यापही अर्धवट आहेत.देहूरोड येथील शस्रास्र कारखाना (आयुध निर्माणी) ते लोहमार्ग उड्डाणपूल व सवाना चौकातून (जुना बँक आॅफ इंडिया चौक) पुढे कॅन्टोनमेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत एलिव्हेटेड रस्ता (सिमेंट पिलरवरून वरच्या वर) बांधण्यात येत आहे. यातील पिलर क्रमांक सात ते नऊ व तेरा ते सोळा दरम्यानचे काम अर्धवट असल्याचे दिसत आहे. त्यावर अद्याप आडवे गर्डेल टाकण्यात आलेले नाहीत. पुलावरील सिमेंट स्लॅबचे काम संथगतीने सुरु आहे. आनुषंगिक कामे शिल्लक आहेत. एलिव्हेटेड रस्त्यावर पथदिवे, वाहतूक सुरक्षा फलक आदी कामे प्रतीक्षेत आहेत. पुलाखालील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. वाहनचालकांना खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे.उड्डाणपुलाला रेल्वे विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षादेहूरोड येथील लोहमार्गावरील दुपदरी पुलाचे चौपदरीकरण करण्याच्या कामास मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाकडून दोन वेळा पुलाचे डिझाईन पाठवण्यात आले होते; मात्र त्यांनी मंजुरी दिली नसल्याने पुन्हा तिसऱ्यांदा नवीन डिझाईन मंजुरीसाठी सुरुवातीला पुणे येथील कार्यालयात पाठविण्यात आले होते. पुण्यातील कार्यालयाने मंजुरी दिली असून अंतिम मंजुरीसाठी मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले असून महिनाअखेर या डिझाईनला मंजुरी मिळण्याची शक्यता असून, मंजुरी मिळाल्यानंतर आगामी चार महिन्यांत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊ शकते, असे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले असल्याने उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास सन २०१९ उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.रस्ते विकास महामंडळाने उड्डाणपुलाचे डिझाईन रेल्वेच्या संबंधित विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले असून या महिनाअखेर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एलिव्हेटेड रस्त्याचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, वाहतूक सुरू करण्यात येणार असून उड्डाणपुलास मंजुरी मिळाल्यानंतर चार महिन्यांत कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.- कुमार कुट, प्रकल्प सल्लागार, राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई
रेल्वे विभागाच्या मंजुरीमध्ये अडकले उड्डाणपुलाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:50 AM