पिंपरी : थेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या समक्ष रुग्ण महिलेला आजारातून बरे करण्यासाठी अंगारे धुपारे लावून मंत्र तंत्र विधीचा प्रकार पुण्यात उघडकीस आला. त्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे सुरू असलेले काम भुताटकीच्या भीतीने कामगारांनी काही दिवस बंद ठेवल्याचे समोर आले आहे. मृतात्म्याची शांती घालण्याच्या भावनेतून मांत्रिकाकडून विधीवत पूजा केली. त्यानंतरच काम पुन्हा सुरू केले. अंधश्रद्धेचा कळस गाठल्याच्या या घटनेने समाजात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे प्रेक्षागृहाचे महापालिकेतर्फे नूतनीकरण सुरू आहे. स्थापत्य विषयक कामे संपली असून आता अंतर्गत सजावट आणि वातानुकूलित यंत्रणेचे काम सुरू आहे. वातानुकूलित यंत्रणेचे काम आनंद रेफ्रिजेटर या संस्थेला दिले आहे. प्रेक्षागृहाच्या आतील बाजूस काम करीत असताना अचानक महिलेचा आवाज आला, बांगड्या खळखळल्याचा आवाज येऊ लागला. असा आरडा ओरडा कंत्राटदार संस्थेकडे काम करणाऱ्या कामगारांपैकी एकाने केला. भुताटकीचा प्रकार आहे, असे भासविल्याने कामगार भयभीत झाले. या ठिकाणी कामावर येण्यास कामगारांना भीती वाटू लागली. त्यामुळे काही दिवस काम थांबविण्यात आले होते.दरम्यान, याठिकाणी भूत, पिश्याच्च असल्याने विधीवत पूजा करून शांती घातली पाहिजे, तरच या ठिकाणी काम करता येईल, अशी उपाययोजना काहींनी सूचविली. त्यानंतर कामगारांनी एकत्रित येऊन मांत्रिकाला पाचारण केले. प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी हळद, कुंकू, लिंबू, मिरची व अन्य पूजा साहित्य आणले. मांत्रिकाकरवी विधीवत कार्यक़्रम घेतल्यानंतर कामगारांच्या मनातील भीती दूर झाली. तब्बल आठ दिवस रखडलेले काम मांत्रिकाकरवी पूजा घातल्यानंतर पूर्ववत सुरू झाले आहे. अंधश्रद्धेपोटी विकासकामांना अडथळे येणे शहरासाठी अशोभनीय आहे. वैज्ञानिक क्रांतीच्या युगात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याबद्दल नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.>महापालिकेच्या आचार्य अत्रे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आनंद रेफ्रिजिरेशन या संस्थेला वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम दिले आहे. त्यांच्याकडील कामगाराने अंधश्रद्धेपोटी भुताटकी घालविण्यासाठी मांत्रिकाला बोलावून पूजा घातली असल्याची चर्चा आहे. ठेकेदाराने त्या कामगारास तातडीने कामावरून काढून टाकले आहे. महापालिकेच्या कामावर कसलाही परिणाम झालेला नाही. वातानुकूलित यंत्रणेचे काम आणखी दीड महिना सुरू राहील.- प्रवीण तुपे, सह शहर अभियंता
भुताटकीने रखडले प्रेक्षागृहाचे काम, बंद ठेवलेले काम मांत्रिकाच्या विधीनंतर पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:50 AM